गाव विकास समिती सामान्य कुटुंबातील तरुणांना राजकारणात संधी देणार
रत्नागिरी : गाव खेड्यातील सर्वसामान्य तरुणांचे प्रश्न सुटावे असे वाटत असेल, सामान्य नागरिकांना न्याय मिळावा अशी भूमिका असेल तर गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठीचे धोरण आखण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांनी राजकारणात यावं असे आवाहन गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी केले आहे.
ग्रामीण भागाचा व सामान्य माणसाचा विकास रखडण्यास प्रस्थापित व्यवस्था कारणीभूत असून या व्यवस्थेत महत्त्वाचा घटक असणारे आणि आपले लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणारे बहुतांश ठेकेदार,बिल्डर आणि धनदांडग्या प्रवृत्तीचे लोकं सर्वसामान्य गरीब जनतेचे दैनंदिन प्रश्न सोडवू शकत नाहीत. त्यासाठीचे धोरण ते ठरवू शकत नाहीत, असे स्पष्ट मत गाव विकास समितीचे सुहास खंडागळे यांनी व्यक्त केले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवायचे असतील गोरगरीब जनतेला न्याय द्यायचा असेल तर या प्रश्नांची जाण असणारा तरुण वर्ग राजकारणात आला पाहिजे.सामान्य कुटुंबातील तरुणांना राजकारणात संधी देण्याचे काम गाव विकास समिती करणार असून तसा ठराव गाव विकास समितीच्या मार्च महिन्यात झालेल्या कोअर कमिटी बैठकीत करण्यात आला असल्याचे सुहास खंडागळे यांनी म्हटले आहे. प्रस्थापित लोक आपले प्रश्न सोडवतील या भ्रमातून गाव खेड्यातील जनतेने,सामान्य नागरिकांनी बाहेर पडावे असे आवाहन खंडागळे यांनी व्यक्त केले आहे. आपल्यासमोर जेव्हा राजकीय नेता किंवा आपला पुढारी म्हणून ज्यांना प्रेझेंट केला जातो ते अवाढव्य खर्च करणारे असतात आणि आपण या बाहेरील रूपाला भुलून मतदान करतो.आपले प्रश्न सोडवले जातील की नाही याबाबत आपण कोणतीच हमी घेत नाहीत. जर प्रश्न गरिबांचे,सामान्य नागरिकांचे आहेत तर प्रश्न सोडवणारे सुद्धा गरिबीची जाण असणारे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे हवेत असे सुहास खंडागळे यांनी म्हटले आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे धोरण ठरवायचे असेल तर त्या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या तरुणांनी आता राजकारणात उतरून यासाठी पुढाकार घ्यावा,गाव विकास समिती अशा तरुणांना संधी देईल असे आवाहन सुहास खंडागळे यांनी केले आहे.