राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सुखोई 30 MKI लढाऊ विमानातून ऐतिहासिक हवाई सफर

Spread the love

नवी दिल्ली-भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी आज (8 एप्रिल, 2023) आसाममधील तेजपूर हवाई दलाच्या तळावरून सुखोई 30 MKI लढाऊ विमानातून ऐतिहासिक हवाई सफर केली. भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर (प्रमुख) असलेल्या राष्ट्रपतींनी वायुसेनेच्या तळावर परत येण्यापूर्वी हिमालयाच्या सफरी बरोबरच ब्रह्मपुत्रा आणि तेजपूर खोऱ्यात सुमारे 30 मिनिटे हवाई सफरीचा आनंद लुटला.

106 स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन नवीन कुमार यांनी विमान उडविले. विमानाने समुद्रसपाटीपासून सुमारे दोन किलोमीटर उंचीवर आणि ताशी सुमारे 800 किलोमीटर वेगाने उड्डाण केले. या अशा प्रकारची हवाई सफर करणाऱ्या राष्ट्रपती मुर्मू या तिसऱ्या राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.

अभ्यागतांची नोंद ठेवणाऱ्या पुस्तकात, राष्ट्रपतींनी एक संक्षिप्त मनोगत लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या, त्या म्हणाल्या, “भारतीय वायुसेनेच्या बलाढ्य सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानात उड्डाण करणे, हा माझ्यासाठी आनंददायी अनुभव होता. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. भारताची संरक्षण क्षमता जमीन, हवाई आणि सागरी अशा सर्व सीमांना व्यापून टाकण्यासाठी प्रचंड विस्तारली आहे, याचा मला अभिमान आहे. मी भारतीय वायुसेना आणि तेजपूरच्या तळावरच्या हवाई दलाच्या संपूर्ण टीमचे या सफरीचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन करते.

यावेळी राष्ट्रपतींना विमान आणि भारतीय वायुसेनेच्या (IAF) परिचालन क्षमतांबद्दलही माहिती देण्यात आली. राष्ट्रपतींनी भारतीय वायुसेनेच्या (IAF) च्या कार्य सज्जतेवर समाधान व्यक्त केले.

सुखोई 30 MKI लढाऊ विमानातून राष्ट्रपतींची हवाई सफर घडवणे हा भारतीय सशस्त्र दलाच्या सर्वोच्च कमांडर या नात्याने सशस्त्र दलांशी संपर्क ठेवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

मार्च 2023 मध्ये, राष्ट्रपतींनी INS विक्रांतला भेट दिली होती आणि स्वदेशी बनावटीच्या विमानातील अधिकारी आणि खलाशांशी संवाद साधला होता.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page