अलिबाग (वार्ताहर) शहरातील ठीकरुळ नाक्यावरील रेशनिंग दुकानाला गुरुवारी (दि.6) दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. दुकानात रॉकेलचा साठा असल्याने आगीचा भडका उडाला. परिणामी सुरक्षिततेच्या दृष्टीने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. तसेच इंडियन ऑइल पेट्रोल पम्पातील कामगारांना बाहेर काढण्यात आलं होत.
सदर घटना घडताच अलिबाग नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने हजर होत आगीवर नियंत्रण मिळवले. आरसीएफ अग्निशमन दल देखील घटनास्थळी हजर होत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत राहुल जगे यांच्या दुकानाचे नुकसान झाले. आगीची घटना कळताच माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, नगरसेविका संजना किर, कैलास जगे, समीर ठाकूर, ॲड. प्रवीण ठाकूर, हर्षल पाटील आदी हजर झाले.
सदर रेशनिंग दुकानाला लागूनच पेट्रोल पंप असल्याने मोठा अनर्थ घडण्याची भीती होती. मात्र आगीवर नियंत्रण मिळाल्याने पुढील अनर्थ टळला.