✴️धावत्या शिवशाही बसने घेतला पेट; चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशी सुखरूप
⏩नागपूर- नागपूरवरुन अमरावतीकडे जाणाऱ्या शिवशाही बसला कोंढाळी जवळ अचानक आग लागली. यावेळी बसमध्ये १६ प्रवासी प्रवास करीत होते. बसचालकाने प्रसंगावधान राखत वेळीच बस थांबवून प्रवाशांना सूचित करत सुखरूप बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याची माहिती असून यात बस पूर्णत: जळून खाक झाली आहे.
⏩शिवशाही बस नागपूरहून अमरावतीकडे निघाली. दरम्यान कोंढाळी नजीकच्या साईबाबा मंदिराजवळून जात असताना बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले त्यांनी तत्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी करत वाहक व प्रवाशांना सूचना केली. यावेळी बसमध्ये १६ प्रवासी प्रवास करीत होते.
⏩चालकाने माहिती देताच सर्व प्रवासी वेळीच आपले सामान घेऊन बसच्या बाहेर पडले. पाहता पाहता बसमधून धुराचे लोट बाहेर पडू लागले व क्षणात आगीने उग्ररुप धारण केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोंढाळी पोलिस अग्निशमन दलाच्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या एसटीने पुढच्या प्रवासाला पाठविण्यात आले.