
भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल याने आज न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दमदार द्विशतक ठोकले. सलग तीन षट्कार टोलवत द्विशतक साजरे करणारा तो जगातील पहिला फलंदाज बनला आहे. त्याने आपली ही ‘विक्रमी’ खेळी ९ षट्कार आणि १९ चौकारांनी सजवली.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये बऱ्याच काळापर्यंत अशक्यप्राय वाटणारे द्विशतक गेल्या काही वर्षांत जागतिक दर्जाचे फलंदाज लीलया फटकावत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांनी २०१० च्या २४ फेब्रुवारी रोजी स्वतःचे व एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिले द्विशतक झळकावले आणि त्यानंतर हा सिलसिला आजपर्यंत अव्याहतपणे सुरु आहे. भारताकडून आत्तापर्यंत सचिन तेंडूलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, ईशान किशन व आता शुभमन गिल यांनी एकदिवसीय सामन्यात द्विशतकी खेळी साकारली आहे. तर पाकिस्तानकडून फखर झमान, वेस्ट इंडीजकडून ख्रिस गेल, आणि न्युझीलंड संघाच्या मार्टिन ग्युप्टील यांना हा कारनामा करण्याचा अनुभव आहे.
यासोबतच शुभमन एकदिवसीय सामन्यांमध्ये द्विशतक झळकवणारा सर्वांत लहान वयाचा खेळाडू बनला आहे. मागच्याच मालिकेत बांगलादेशविरुद्ध संधी मिळालेल्या ईशान किशनने २१० धावांची खेळी केली त्यावेळेस त्याचे वय २४ वर्षे १४५ दिवस इतके होते तर आज २०८ धावा करणारा शुभमन २३ वर्षे १३२ दिवसांचा आहे. यासोबतच न्यूझीलंडसारख्या तगड्या संघाविरोधात शुभमन गिलने साकारलेली खेळी आजपर्यंतची सर्वोत्तम खेळी आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडूलकर यांच्या नावावर होता. १९९९ मध्ये हैद्राबादमध्ये याच मैदानावर सचिनने १८६ धावा केल्या होत्या. त्यामुळे शुभमनच्या आजच्या खेळीने हा विक्रमही मोडीत काढला.
शुभमन गिलची एकहाती द्विशतकी झुंज सोडल्यास अन्य कोणत्याही भारतीय फलंदाजाला खेळपट्टीवर फार काळ टिकू न देण्यात किवी गोलंदाज यशस्वी ठरले. त्यामुळे निर्धारित ५० षटकांत भारतीय संघ ८ गडी बाद होत ३४९ धावा करू शकला. कर्णधार रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी पहिल्या गड्यासाठी ६० धावांची भागीदारी केली यामध्ये रोहितचे ३४ धावांचे योगदान होते. त्यानंतर सुर्यकुमार यादवने ३१ धावांची छोटेखानी खेळी केली. याव्यतिरिक्त भारतीय फलंदाज मैदानावर उपस्थिती नोंदवून ठराविक अंतराने मैदानाबाहेर आले. न्यूझीलंडकडून हेनरी शिफ्ली आणि डेरेल मिशेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.