ठाणे- महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रथयात्रेला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी झेंडा दाखवून या यात्रेचा शुभारंभ केला. यानिमित्ताने जैन मुनींचे आशीर्वाद देखील मुख्यमंत्र्यांनी घेतले तसेच जैन बांधवांशी संवाद साधला.
भगवान महावीरांचे विचार आचरणात आणून मार्गक्रमण करणारा जैन समाज हा अत्यंत शांतताप्रिय समाज आहे. या समाजाने क्षमाशील वृत्ती जोपासून मानवजातीच्या कल्याणासाठी कार्यरत राहण्याला प्राधान्य दिले आहे. आज भगवान महावीरांच्या जयंतीदिनी त्यांचे हेच विचार आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरावे अशा शुभेच्छा माननीय मुख्यमंत्री यांनी या प्रसंगी दिल्या.
राज्यात युती सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वच सणांवरील निर्बंध दूर झाले असून त्यामुळेच आज महावीर जयंतीनिमित्त निघणारी रथयात्रा देखील त्याच उत्साहात निघत असल्याचे यावेळी सांगितले. समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार असून यापुढेही सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी ते कटिबद्ध असेल असेही यासमयी मुख्यमंत्र्यांनी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप प्रदेश सचिव संदीप लेले आणि श्री ठाणा जैन महासंघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच जैन बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.