
सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन प्रशासनाला त्यांच्या कार्याची जाणीव करून देणारा, प्रसंगी जनआंदोलन उभे करून प्रशासनाला वठणीवर आणणारा संगमेश्वर तालुक्यातील हाडाचा कार्यकर्ता म्हणजे भाजपा युवा मोर्चा (रत्नागिरी द.) जिल्हा उपाध्यक्ष रूपेश कदम. हाती घेतलेले प्रत्येक काम तडीस नेण्यासाठी कायम प्रयत्नशील रहाणे त्यासाठी आवश्यक ठिकाणी पक्षविरहीत भूमिका घेणे तर योग्य वेळ साधून पक्षाची भूमिका जनसामन्यांच्या मनावर बिंबवणे या खुबीमुळे ओझरे जिल्हा परिषद गटातील नागरिकांचा ओढा भारतीय जनता पक्षाकडे वाढू लागत असल्याचे चित्र समोर येत आहे.
मागील काही महिन्यांपासून रस्ते सुधारणाविषयक केलेल्या कामाने रूपेश कदम ओझरे जिल्हा परिषद गटात लोकप्रिय होत आहेत. सोमवार, १६ जानेवारी रोजी या जिल्हा परिषद गटात असणाऱ्या मेघी गावातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा संगमेश्वर तालुकाध्यक्ष श्री. प्रमोद अधटराव यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. माजी उपनगराध्यक्ष (देवरुख नगरपरिषद) व भाजपा देवरुख शहराध्यक्ष श्री. सुशांत मुळ्ये यांनी पक्षप्रवेशानंतर सर्वांचे स्वागत केले व आपण सर्वांनी रूपेश कदम यांच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी संपूर्ण संगमेश्वर भाजपा कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले.. ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. मुकुंदराव जोशी यांनी त्यांच्या काळातील अनुभव सांगत भाजपा आता अधिक सशक्त होत आहे असे मत व्यक्त करत त्याचे श्रेय रूपेश कदम यांच्यासारख्या लोकांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आहे असे म्हटले.
रूपेश कदम हे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रश्मीताई कदम यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांना राजकीय वारसा आपल्या आईकडूनच मिळाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करणारे रूपेश कदम अनेकदा विरोधकांच्या रडारवर आले आहेत. मात्र त्या प्रत्येकवेळी जनतेतूनच आवाज उठला आणि विरोधकांना माघार घ्यावी लागली. संपूर्ण ओझरे जिल्हा परिषद गट मार्च २०२३ पर्यंत भाजपमय करण्याचा संकल्प यानिमित्ताने त्यांनी केला आहे.