▶️दिल्ली- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना माफी मागायची नसेल तर मागू नये. या देशासाठी जास्तीत जास्त यातना सहन करणाऱ्यांमध्ये वीर सावरकर आहेत. स्वातंत्र्यलढ्यात एकच व्यक्ती आहे ज्यांनी दोन जन्मठेपेची शिक्षा भोगली आहे. वीर हुतात्मांवर असा शब्दप्रयोग करणे अयोग्य आहे. जर त्यांचा आमच्यावर विश्वास नसेल तर राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर काय भाषण केले होते ती वाचावीत, त्यामुळे तरी त्यांना वीर सावरकर समजतील. त्यांना त्यांचे साथीदार शरद पवार आणि उद्धव ठाकरे जे सांगत आहेत त्यांचे तरी ऐकावे, असे गृहमंत्री अमित शाह एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलले.
▶️देशात पुढील वर्षी म्हणजेच २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांवेळी बिहारमध्ये सर्वच्या सर्व ४० जागांवर भाजपच्या उमेदवारांना निवडणूक द्या, त्यानंतर, २०२५ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळवून द्या. त्यानंतर, बिहारमध्ये दंगलखोरांना उलटं लटकवून सरळ करण्याचे काम करू, अशा शब्दात अमित शहांनी बिहारमधील जनतेला आवाहन केले. दरम्यान, अमित शहा बिहारसाठी जास्त सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. कारण, गेल्या ६ महिन्यात त्यांचा हा ५ वा बिहार दौरा आहे. बिहार दौऱ्यातील पहिल्याच दिवशी शहा यांनी पाटणा येथील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपला सर्वाधिक जागा कशा निवडून आणता येतील, यावर या चर्चेत मंथन झाल्याचे समजते.