मुंबई (शांताराम गुडेकर )
राॅयल सेलिब्रेशन हाॅल येथे नुकतेच भांडुप पोलीस ठाणे, सक्षम समुपदेशन केंद्र-विक्रोळी (पूर्व प्रादेशिक विभाग), मिरॅकल फाउंडेशन (मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती उपचार केंद्र) आणि देवामृत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “जीवन जगण्यासाठीचा जागर” हा विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात भांडुप पोलीस ठाणे विभागात होणाऱ्या आत्महत्या या विषयावर डॉक्टर अंबरीश धर्माधिकारी (मानसोपचार तज्ञ) यांनी सांगितले की, आत्महत्या पूर्वी त्या व्यक्तीस नैराश्य आलेले असते. अशावेळी त्यांची मानसिकता लक्षात घेऊन, त्यांना बोलतं करणे. ते सांगत असलेल्या माहितीकडे लक्ष देणे. त्यावर कोणतेही प्रश्न न विचारता अथवा त्याकडे दुर्लक्ष न करणे. तसेच योग्य वेळी त्यांना मानसोपचार तज्ञ यांच्याकडे समुपदेशन व उपचार साठी घेऊन जाणे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीची ती वेळ जर टळली तर, निश्चितच ते आत्महत्या पासून परावृत्त होतील.
मिरॅकल फाउंडेशन (मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती उपचार केंद्र) चे समन्वयक रमेश सांगळे म्हणाले की, व्यसनाधीन झाल्यानंतर शेवटची पायरी आत्महत्येची असते. आपण पालक म्हणून आपल्या पाल्यांकडे योग्य वेळी लक्ष देणं गरजेचं असते. मुलांचे मित्र, त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळा, याबाबत मित्रांप्रमाणे त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. तसेच मुलगा काहीतरी व्यसन करीत आहे. हे लक्षात आल्यानंतर त्यास पाठीशी न घालता, मारहाण अथवा बडबड करण्यापेक्षा मानसोपचार तज्ञांकडे घेऊन जाऊन समुपदेशन व उपचार घेणे गरजेचे आहे. जर आपण त्याला पहिली वेळ आहे. पुढे असे करू नको अशी समज दिली. तरीसुद्धा मुलं व्यसनांकडे वळतातच आणि मग ती व्यसनाधीन झाल्याच्या त्यांना व्यसनातून बाहेर काढणं कठीण जाते. मुलं अथवा घरातील कोणतीही व्यक्ती व्यसन करून आजारी होतात तर त्यांचे कुटुंब व्यसन न करता आजारी होते. यासाठी पालकांनीही स्वतः निर्व्यसनी रहाणं गरजेचे आहे.वरील विषयास अनुसरून उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मार्गदर्शन करणाऱ्या वक्त्यांनी दिली.
कार्यक्रमास श्रीमती. सुरेखा कपिले (स.पो.आयुक्त-भांडुप विभाग), सक्षम समुपदेशन केंद्राचे अक्षय कुलकर्णी (क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ) देवामृत फाउंडेशनच्या संचालिका श्रीमती. प्रिया जाधव,स्वप्निल तावडे, यांच्यासह भांडुप विभागातील तुळशेतपाडा, टेंबीपाडा येथील महिला, पुरुष व तरुण वर्ग जास्त संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नितीन उन्हवणे (व. पो. निरीक्षक, भांडुप पोलीस ठाणे) यांनी केले.