मुंबई, 1 एप्रिल
१ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरू झाले असून अमूलने सामान्यांना मोठा झटका दिला आहे. अमूल दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.
अमूल दूध महागले
अमूल ताझा, शक्ती, टी स्पेशल, गायीचे दूध, स्लिम अॅंड स्ट्रिम, गायीचे दूध, म्हशीचे दूध या ब्रॅंडच्या किंमतीत आता २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. अमूलने सहा महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा दुधाच्या दरात वाढ केली आहे.
नव्या किमतीनुसार आता अमूल गोल्ड ६४ रुपये, अमूल शक्ती ५८ रुपये आणि अमूल फ्रेश ५२ रुपये प्रति लिटर दराने विकले जाईल. यासोबत म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर चार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. उत्पादन आणि खर्चात वाढ झाल्याने अमूल दुधाच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती कंपनीने एका निवेदनाद्वारे दिली आहे.
दरम्यान, नव्या आर्थिक वर्षात सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे. देशभरातील महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर टोल टॅक्समध्ये वाढ झालेली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टोलवाढ जाहीर करण्यात आली आहे. आता या मार्गावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना १८ टक्के अधिक टोल भरावा लागणार आहे. तसेच दिल्ली मेरठ एक्स्प्रेसवे आणि NH-9 वरील टोल टॅक्स सुमारे १० टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.