दिलासादायक  नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक सिलेंडर दरात कपात

Spread the love

⏩नवी दिल्ली-दिल्लीआर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्याच दिवशी नागरिकांना दिलासा मिळाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेच बदल झालेले नाहीत. मात्र व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात केंद्रानं घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ केली होती. या महिन्यात घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. पण व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. सरकारी गॅस कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचे दर ९१.५० रुपयांपर्यंत कमी केले आहेत. त्यामुळे आता मुंबईत व्यावसायिक वापराचा सिलिंडर १ हजार ९८० रुपयांना मिळेल.

घरगुती वापराच्या सिलिंडरपेक्षा व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात अधिक बदल पाहायला मिळतात. राजधानी दिल्लीत आजपासून १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर २ हजार २८ रुपयांना मिळेल. याआधी सिलिंडरचा दर २ हजार २५३ रुपये होता. गेल्या वर्षभरात दिल्लीत सिलिंडरचे दर २२५ रुपयांनी कमी झाले आहेत. कोलकात्यात व्यावसायिक सिलिंडरचा दर २ हजार १३२ रुपयांवर, तर चेन्नईत २ हजार १९२ रुपयांवर आला आहे

सरकारी गॅस कंपन्या दर महिन्याला एलपीजीच्या दरात बदल करून नवे दर प्रसिद्ध करतात. मार्च महिन्याच्या प्रारंभी एलपीजी वापरकर्त्यांना धक्का बसला होता. कारण घरगुती वापरासाठीचा सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला होता. तर व्यावसायिक वापराच्या सिलिंडरच्या दरात तब्बल ३५० रुपयांनी वाढ झाली होती. मात्र यंदा घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ झालेली नाही. तर व्यावसायिक वापराचा सिलिंडर ९१.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page