जनशक्तीचा दबाव न्यूज | शिपोशी | मार्च ३१, २०२३.
संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि अन्य उपक्रमांच्या माध्यमातून विधायक पद्धतीने साजरा करत असताना देशातील काही गावांमध्ये अजुनही पायाभूत सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. स्थानिक आमदार-खासदारांच्या पाठीशी लागूनही चिंचुर्टी (हुंबरवणे) गावात अद्याप पक्का रस्ता उपलब्ध नाही. याविषयी असणार्या उदासीनतेचा निषेध करून शासनाचे लक्ष वेधून रस्त्याचे कामकाज मंजूर करण्यासाठी चिंचुर्टी (हुंबरवणे) गावातील नागरिकांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला.
दि. २८ मार्च पासून सुरू असणार्या या उपोषणाचा आज चौथा दिवस होता. “आमचे उपोषण प्राणांतिक असून आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही तसूभरही मागे हटणार नाही” अशी भूमिका घेतलेल्या चिंचुर्टीकरांना सौ. राजश्री ऊर्फ उल्का विश्वासराव यांनी मंत्री ना. रविंद्र चव्हाण व उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने आश्वस्त केले. व उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
या आश्वासनावर विश्वास ठेऊन उपोषणकर्त्या सर्व सहाजणांनी एकमुखाने उपोषण मागे घेतले. सहापैकी ५ जणांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे जवळच्याच प्रा. आ. केंद्र शिपोशी येथे दाखल करण्यात आले. अत्यंत दुर्गम खेड्यात रहाणार्या लोकांना आता तरी न्याय मिळेल व विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतले जाऊ याची शाश्वती पटली आहे हे स्पष्ट जाणवते. सौ. विश्वासराव यांनी सर्वांना लिंबू सरबत देऊन उपोषण समाप्त केले.
यामध्ये श्री. विश्वनाथ शांताराम मांडवकर, श्री. सुभाष लुकाजी मोसमकर, श्री. रमेश शांताराम मोसमकर, श्री. वासू महादेव पवार, श्री. संदीप सोनू ठोंबरे, श्री. गणपत यशवंत जाधव यांनी हे उपोषण यशस्वी केले. पो.काॅ/45 श्री. अमोल गजानन दळवी यांनी अत्यंत जबाबदारीने उपोषणकर्त्यांना सहकार्य केले. डॉ. नामदेव ढोणे, डॉ. धाकड, परिचारिका श्रीम. शीतल चरकरी, श्रीम. पी. पी. गोसावी, लॅब असिस्टंट श्रीम. क्रांती कांबळे यांच्या निगराणीखाली सर्व उपोषणकर्त्यांच्या आरोग्याची देखभाल सुरू आहे. सौ. विश्वासराव यांच्या प्रयत्नांनी हे उपोषण मागे घेतल्यामुळे स्थानिक प्रशासनाने त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी भाजपा लांजा तालुका उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर, श्री. श्रीकांत ठाकुरदेसाई, श्री. कमलाकर शिवगण व अन्य भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.