सातारा : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटातील रस्ता आजही धोकादायक स्थितीत आहे.यामुळे आगामी काळात नैसर्गिक संकट आल्यास सातारा जिल्ह्यातील 40 गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चार वर्षांपासून रस्त्यावर कोसळलेली दरड अजूनही तशीच आहे. या भागाकडे लक्ष द्यावे अशी साद शिंदी विभागातील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.कोयना अभयारण्यात शिवसागर जलाशय शेजारी वसलेल्या सातारा जिल्ह्यातील 40 हुन अधिक गावांचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याशी असणारा संपर्क यावर्षी पूर्णतःच ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला घाटातील खचलेला अरुंद रस्ता यामुळे शिंदी विभागातील जनतेला आपला जीव मुठीत घेऊनच सध्या या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे.