संगमेश्वर : वडिलोपार्जित शेतजमिनीत सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करुन ते मंजूर करण्याकरिता २५ हजाराची लाच घेणारा मंडल अधिकारी आणि तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली. मंडल अधिकारी उल्हास विश्वनाथ मुरुडकर (वय- ४६ ) आणि कनकाडी सजाचे तलाठी संतोष महादेव मोघे अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील एका तरुणाने वडिलोपार्जित शेतजमीन मिळकतीवर स्वतःचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल करण्याचे प्रकरण दाखल केले होते. ते मंजुरीसाठी पाठविण्याकरिता तलाठी मोघे यांनी २८ फेब्रुवारी रोजी लाच म्हणून मोबाईल फोनची मागणी केली होती. ही नोंद मंजूर करण्याकरिता मंडल अधिकारी उल्हास विश्वनाथ मुरुडकर यांनी २८ फेब्रुवारी आणि १३ मार्च २०२३ रोजी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार तरुण आणि मंडल अधिकारी यांच्यात चर्चा होऊन बुधवार २९ मार्च रोजी व्यवहार निश्चित झाला. त्यानुसार बुधवारी मंडल अधिकारी मुरुडकर याने तक्रारदाराकडून २५ हजार रुपये लाच स्वीकारली. त्यावेळी सापळा रचून लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत मंडल अधिकारी आणि तलाठी या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरु आहे