रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात भाजपा मध्ये जोरदार भरती…..
संगमेश्वर :प्रतिनिधी (वै.वीरकर) संगमेश्वर तालुक्यात सध्या भाजपाच्या दिशेने वारे वाहू लागले आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना, राज्यातील नव्या सरकारची दमदार कामगिरी आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मार्गी लागत असणारी कामे या सर्व गोष्टींमुळे स्थानिक पातळीवर भाजपचा खासदार, आमदार, जि.प. किंवा पं.स. सदस्य नसतानाही भाजयुमो रत्नागिरी दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष श्री. रूपेश कदम व संगमेश्वर भाजपाचे तालुकाध्यक्ष श्री. प्रमोद अधटराव यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन सर्वपक्षीय कार्यकर्ते ग्रामस्थांना सोबत घेऊन भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश करत आहेत.
निवे गावातील भाजपाचे बूथप्रमुख श्री. प्रमोद पवार यांनी गावातील रस्त्याबाबत एक निवेदन भाजपा तालुकाध्यक्ष श्री. अधटराव यांना दिले होते. यावर अत्यंत नियोजनबद्ध रीतीने प्रस्ताव करून, सदर रस्त्याबाबत पाठपुरावा करून त्यांनी रस्ता मंजूर करून घेतला. यामुळे गावातील गोरूलेवाडीत राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. श्री. रूपेश कदम हे स्थानिक असून प्रत्येक कामात ग्रामस्थांना सहकार्य करत असल्याने त्यांच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण गोरूलेवाडी ग्रामस्थ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले आहेत.
यावेळी बोलताना रूपेश कदम म्हणाले, “देशाचे पंतप्रधान हे विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे नेते आहेत. त्यांच्या स्वप्नांना बुलंद करण्यासाठी आम्ही कार्यकर्ते कटिबद्ध आहोत. आम्हाला या विकासयात्रेत तुमची साथ, सक्रीय सहकार्य आवश्यक आहे. गोरूलेवाडी सोबतच संपूर्ण निवे भाजपमय करायचे आहे. आता प्रत्येक नव्या सदस्याने या कामात आम्हाला साथ द्या. आपण नक्कीच बदल घडवू.” तर ओबीसी जिल्हा अध्यक्ष श्री.अभिजीत शेट्ये म्हणाले, “स्थानिक पातळीवर आमदार, खासदार आपल्या पक्षाचे नसतानाही आपण विकासात्मक कामे करत आहोत. कल्पना करा आपण सर्वांनी आपल्या हक्काचा आमदार निवडून दिल्यास आपण किती प्रगती करू शकतो. आजचा पक्षप्रवेश आमच्या माध्यमातून होत आहे याचा निश्चित आनंद आहे मात्र याचे संपूर्ण श्रेय मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब व आमचे नेते मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस व मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांना जाते हे नम्रपणे कबूल करतो. याचे कारण म्हणजे, या सर्व अशा विभूती आहेत की ज्या कोणताही भेद करत नाहीत. समोर आलेल्या कामाची आवश्यकता समजून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले जातात. नाहीतर काही काळापूर्वी असलेल्या सरकारने केवळ स्थगिती देण्याचेच काम केलेले आपण पहिले असेलच.
जवळपास ४० ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे भाजपामध्ये प्रवेश केल्याने निवे गावात राष्ट्रवादीला सुरुंग लागल्याचे बोलले जात आहे. भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. अभिजित शेट्ये, भाजपा रिक्षा संघटना, देवरुखचे अध्यक्ष श्री. प्रमोद शिंदे, ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते मुकुंदराव जोशी, शक्तीकेंद्र प्रमुख श्री. बाबू गुरव, श्री. अनंत बांडागळे,श्री.प्रमोद पवारश्री. महेश धामणस्कर, श्री. गणेश मोहिते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.