ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग) डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांवर पालिकेकडून नियमित कारवाई सुरू आहे. तरीही रेल्वे स्थानकात भागात दिवसभरात एकही फेरीवाला दिसता कामा नये, अशी आक्रमक भूमिका मनसेचे आ. प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी घेतली आहे. गेल्या १० दिवसापूर्वी पालिकेला इशारा देऊन फेरीवाले हटविण्यात प्रशासन कमी पडत असल्याने आ. पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना आता आमच्याकडे दुर्लक्ष करा, असा आक्रमक इशार देत मनसे कार्यकर्तेच आता फेरीवाल्यांवर योग्य ती कारवाई करतील, असा सूचक इशारा दिला आहे.
इशाऱ्यामुळे डोंबिवली, कल्याणमध्ये मनसे विरुध्द फेरीवाला संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. मागील दोन महिन्यापासून डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला दिसणार नाही, अशी आक्रमक कारवाई ग, फ आणि ह प्रभागाकडून सुरू आहे. काही फेरीवाले चोरुन रेल्वे स्थानक भागात व्यवसाय करतात. नागरिकांना रस्ते, पदपथ मोकळे मिळत नाहीत, असे आ. पाटील यांचे म्हणणे आहे.पालिकेकडून कारवाई होत नसल्याने मनसेने आम्हीच फेरीवाल्यांवर कारवाई करतो, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
सेनेला इशारा?
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातून फेरीवाला शुल्क वसुलीचे काम शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या एजन्सीकडे आहे. या एजन्सीला नियमित फेरीवाला शुल्क वसुली करता यावे यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्याचा एक कार्यकर्ता अरुण जगताप हा कामगार फ प्रभागात सक्रिय आहे. आयुक्त दांगडे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांनी १५८ कामगारांच्या बदल्या केल्या यामध्ये जगताप यांना डावलून पुन्हा आहे त्या प्रभागात ठेवण्यात आले.
मागील तीन वर्षापासून जगताप यांच्या आयुक्तांकडे तक्रारी आहेत. सेनेचा एक पदाधिकारी यामध्ये हस्तक्षेप करत असल्याने जगताप यांना अभय मिळते. जगताप यांच्या आशीर्वादामुळेच डोंबिवली पूर्व भागात फेरीवाले ठाण मांडून बसतात, असे पालिकेचे कामगार खासगीत बोलतात. पूर्व भागात फेरीवाल्यांच्या माध्यमातून मोठा गल्ला होतो, अशी माहिती मनसे आ.राजू पाटील यांना मिळाली आहे.कल्याण ग्रामीण भागात आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची स्वप्ने पाहणाऱ्या सेनेच्या एका पदाधिकाऱ्याची आर्थिक कोंडी करण्यासाठी मनसेने हे आंदोलन हाती घेतले असल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.