भाजपा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांची घोषणा
रत्नागिरी मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी राज्यभर निदर्शने करणार आहे. दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातही सर्वत्र निदर्शनात्मक आंदोलन केले जाईल. उद्या शनिवारी रत्नागिरीमध्ये सकाळी १०.३० वाजता जयस्तंभ येथे निदर्शने केली जाणार असल्याचे भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे, याबद्दल काहीच बोलत नसल्याबद्दल ॲड. पटवर्धन यांनी आश्चर्य व्यक्त केले.
ॲड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी या आडनावावरून अपमानास्पद टिप्पण्णी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केला. न्यायालयाने याबद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे आलेल्या राजेशाही मानसिकतेततून बाहेर पडले नाहीत, असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसते. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत. काँग्रेस नेत्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल भाजपा न्यायालयात दाद मागेल.
सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असते, असे वक्तव्य राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत बोलताना केले होते. मोदी या आडनावाच्या अनेक व्यक्ती क्रीडापटू आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनीअर आहेत, व्यावसायिक आहेत. एखाद्या आडनावाशी संबंधित लोकांचा एखादी व्यक्ती जाहीर सभेत अपमान करत असेल तर त्या विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींना मानहानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. आपण कोणालाही अपमानित करावे, हा आपला अधिकार आहे, असे राहुल गांधींना वाटत असेल तर त्यांच्या वक्तव्यामुळे अपमानित झालेल्या व्यक्तीला त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, असेही जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी पत्रकात नमूद केले.