कोल्हापूर : राज्य सरकार नवे आयटी धोरण राबविणार आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश करण्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.राज्य सरकारच्या वतीने लहान-लहान जिल्ह्यांमध्ये नवीन आयटी केंद्रे स्थापन करण्याबाबत प्रकाश आबिटकर यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित करून कोल्हापूर जिल्ह्याचा नवीन आयटी धोरणामध्ये समावेश करावा, अशी मागणी केली.
कोल्हापूर जिल्ह्यातील युवक आयटी कंपन्यांतील नोकरीनिमित्ताने पुणे, मुंबई, बंगळूर, हैदराबाद आदी शहरांत जातात. लहान शहरांत आयटी सेंटरची उभारणी केल्यास त्यांना स्थानिक ठिकाणी रोजगार मिळेल. कोल्हापुरात आणखी आयटी कंपन्या आल्या, तर कर्मचारी संख्या वाढेल तसेच तालुक्यांच्या ठिकाणी आयटी केंद्रे उभारण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभाग व उद्योग विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आबिटकर यांनी केली.
राज्यात सध्या आयटी हब उभा करण्याबाबत कोणतीही पॉलिसी राज्य शासनाकडे नाही. नवीन आयटी सेंटर उभारणीबाबत धोरण तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश केला जाईल. सध्या कोल्हापुरात छोट्या प्रमाणात आयटी पार्क आहेत. तेथे हजार-बाराशे लोक काम करतात. त्यांच्या विस्तारीकरणासाठी वाव असल्यास आणखी कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न करू. आयटी पॉलिसी आणताना डेटा सेवेच्या मुद्द्याचा त्यात समावेश केला आहे. त्यामुळे राज्य शासन लवकरच नवीन आयटी धोरण जाहीर करेल, असे सामंत यांनी सांगितले.