खेड : खेड मधील जेष्ठ पत्रकार दिलीप धोंडू जाधव यांचे काल मोरवंडे येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. काही दिवसांपासून ते प्रदीर्घ आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांकडून शोक व्यक्त केला जात आहे.
पत्रकार दिलीप जाधव यांची पत्रकारिता क्षेत्रातील कामगिरी मुंबई येथून सुरू झाली. काही वर्षांपूर्वी त्यांनी खेड तालुक्यात आपल्या गावी पत्रकारितेला सुरूवात केली. रत्नागिरी टाइम्स, पुढारी, सामना या वर्तमानपत्रात त्यांनी तालुका प्रतिनिधी म्हणून काम केले तर पराशक्ती, कोकण संग्राम, आशा विविध साप्ताहिकचे कार्यकारी संपादक, संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे.
सध्या ते कोकणातील अग्रगण्य माझे कोकण या स्थानिक वृत्त वाहिनीचे कार्यकारी संपादक तसेच सामना दैनिकाचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते.
पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना मुंबई तसेच खेड मध्ये अनेक दिगग्ज पत्रकारांसोबत त्यांचे चांगले संबंध होते.
खेड मध्ये पत्रकारिता करत असताना ग्रामीण भागातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी विशेष वार्तांकने केली होती. त्यांच्या अनेक बातम्या चांगल्या प्रसिद्ध झाल्या. त्यांनी हाताळलेले अनेक विषय मार्गी लागले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे