भाजपा नेते डॉ. निलेश राणे व तालुकाध्यक्ष श्री. प्रमोद अधटराव यांचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांसोबत साजरा.
पिरंदवणे | मार्च २०, २०२३.
कोकणचे नेते, माजी खासदार डॉ. निलेश राणे व भाजपा तालुकाध्यक्ष, माजी पं.स. उपसभापती श्री. प्रमोद अधटराव यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून संगमेश्वरमध्ये गेले तीन दिवस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आज सोमवार दि. २० मार्च रोजी खाडीपट्ट्यातील पिरंदवणे येथे शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यासाठी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. अभिजित गुरव यांनी पुढाकार घेतला.
“विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सदिच्छा देण्यासाठी आम्ही आवश्यक साहित्य वाटप करत आहोत. विद्यार्थ्यांनी याचा सदुपयोग करत उत्तम सुयश प्राप्त करावे” असा संदेश यावेळी श्री. गुरव यांनी दिला. “माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांचे अभीष्टचिंतन करतो तसेच भाजपा संगमेश्वरचे तालुकाध्यक्ष श्री. प्रमोद अधटराव यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शासन आपल्या स्तरावर कार्यरत असते परंतू सर्वपक्षीय कार्यकर्ते, देणगीदार हेही तितकेच सहकार्य करत असल्याने शाळा सक्षमपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहे. आपल्याकडून प्राप्त झालेल्या या सहृदय भेटीबद्दल आम्ही सर्व कृतज्ञ आहोत.” शाळेचे प्रभारी मुखायाध्यापक श्री. संदेश सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम मा. सरपंच, गावातील तीनही जि. प. शाळांचे विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.