भाजपा उद्योग आघाडी, महिला समिती सहप्रमुख उल्का विश्वासराव यांची खरमरीत टीका.

🔴 जनशक्तीचा दबाव न्यूज | लांजा | मार्च १९, २०२३.
🔹 माझ्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्याचा दुर्बळ प्रयत्न करणारे स्थानिक आमदार डॉ. राजन साळवी सर्वार्थाने “आयत्या बिळावर नागोबा” आहेत; अशी संतप्त प्रतिक्रिया राजश्री ऊर्फ उल्का विश्वासराव यांनी दिली. त्यांनी अशा गोष्टी वेळ हातात असतानाच थांबवाव्यात. स्वतःला कार्यप्रवण करावे. आणि खरोखर स्वतःच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांचे श्रेय जनतेच्या साक्षीने घ्यावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
🔹 लांजा तालुक्याचा पूर्व भाग आत्तापर्यंत उपेक्षित होता. मात्र नागरिकांची गरज आणि त्यांच्या मागण्या समजून घेत, आवश्यक ठिकाणांना स्वतः भेटी देऊन मग सदर विकासकामांचे प्रस्ताव तयार केले. याकरीता आवश्यक त्या बाबींची पूर्तता करून ही कामे मंजूर करून घेतली. मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्रजी चव्हाण साहेब यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले. यामध्ये जवळपास साडेतेरा कोटी रुपयांची कामे आणण्यासाठी निवेदने आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा लागला. त्यानंतर मंजूर झालेल्या कामांचे श्रेय मागून घ्यावे लागत नाही जनता स्वतः देणारच आहे. प्रभानवल्ली खोरनिनको महालक्ष्मी मंदिर पुलाच्या बांधकामासाठी चार कोटी रुपये, शिपोशी हरिहरेश्वर मंदिर येथे मोठ्या पुलाच्या कामासाठी ५ कोटी रुपये, मुचकुंदी नदीवरील मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी ३ कोटी ५० लाख रुपये तर भांबेड ते गावडी घाटरस्ता बांधकामाच्या सर्वेक्षणासाठी १ कोटी रूपयांचा भरीव निधी मा. ना. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला. मात्र अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर गावडी ते शाहुवाडी या रस्त्यासाठी मंजूर झालेला निधी आपणामुळेच मंजूर झाला असा बोभाटा डॉ. राजन साळवी व त्यांच्या बगलबच्च्यांनी सुरु केला आहे. अशी सणसणीत टीका उल्का विश्वासराव यांनी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने केली.
🔹 होलिकोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेला अर्थसंकल्प निश्चितपणे अभिनंदनास्पद होता. लांजा तालुक्यात श्रेयवाद निर्माण होईल याची स्वप्नातही कल्पना केली नव्हती. तथापि विविध विकासकामांना मंजुरी मिळताच यांनी जाहिरातबाजी सुरु केली. आम्ही मात्र सणाच्या जल्लोषमय वातावरणात मग्न असल्याने आमदारांच्या कार्यकर्त्यांना श्रेय लाटण्याची आयती संधी मिळाली. सलग तिसरी टर्म म्हणून आपण या मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करत आहात. किमान १० विकासकामे तरी जनतेसमोर मांडा. साहेब, जनता विचारी आहे, सुज्ञ आहे. आता तुमच्या श्रेयवादाला कोणीही भुलणार नाही. नव्हे…! मी कोणालाही भुलू देणार नाही.
🔹 सध्या सत्तेत असणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचे दोन शब्दांत वर्णन करायचे असेल तर ‘प्रगतीचे सरकार’ असेच करता येईल. हे सरकार संकल्पाधिष्ठित आहे. यापुढेही तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उभारण्यासाठी मी सातत्यपूर्ण प्रयत्न करेन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पणदेखील आमचे नेतेच करतील असा विश्वास यावेळी उल्का विश्वासराव यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपा लांजा तालुकाध्यक्ष श्री. महेश खामकर, कार्यकर्ते श्री. बावा राणे आदी उपस्थित होते.