मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या 84 किमीच्या रस्त्याच्या रखडलेल्या काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज दिले.
सध्या महामार्गाचे काम 10 टप्प्यांमध्ये सुरू आहे. त्यापैकी 5 टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतिपथावर असून ते जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देशही चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय राखण्याच्या सूचनाही यावेळी चव्हाण यांनी दिल्या.
अपूर्ण राहिलेल्या कामांची परिस्थिती पाहण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. रायगड जिल्ह्यातील कासू ते पनवेल या 42 किमीच्या महामार्गावरील एका मार्गिकेचे काम मेअखेरपर्यंत पूर्ण करण्यासह दुसऱ्या मार्गिकेवरील खड्डे बुजवण्यात यावेत.
तसेच महामार्गावरील ब्लॅकस्पॉटवरील कामेही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. महामार्गावर प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी घेण्याच्याही सूचना चव्हाण यांनी केल्या.
परशुराम घाट 7 दिवस मार्ग बंद?
परशुराम घाटाचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा मार्ग किमान 7 दिवस पूर्णपणे बंद ठेवावा लागेल. त्यामुळे या घाटातील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग असलेला चेळणीचा पर्यायी मार्ग पावसाळ्यापूर्वी सुसज्ज करण्यात येईल. तसेच भूसंपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात येतील, असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.