मुंबई : ‘मीरा-भाइंदर रोड येथील एस.के. स्टोन मैदानात शनिवार (१८ मार्च) व रविवारी (१९ मार्च) होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रिकरण केल्यानंतर त्यात महाराज धीरेंद्र शास्त्री किंवा आयोजकांकडून काही आक्षेपार्ह कृत्य झाल्याचे आढळल्यास पोलिसांनी कायद्याप्रमाणे कारवाई करावी’, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी स्थानिक पोलिसांना दिले. मात्र, त्याचवेळी या कार्यक्रमाला परवानगी दिल्याबद्दल राज्याच्या गृहमंत्र्यांविरोधात कारवाईचे निर्देश देण्याची विनंती करणारी जनहित याचिका न्यायालयाने फेटाळून लावली
बागेश्वर बाबा स्वत: डॉक्टर नसूनही उपचार सांगतात. त्याचबरोबर अंधश्रद्धा पसरवतात. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नागपूरमध्ये जानेवारीमध्ये झालेल्या कार्यक्रमातील त्यांच्या वक्तव्यांचे पुरावे देऊन बागेश्वर बाबा यांच्याविरोधात कारवाई करण्याची विनंती १७ मार्चच्या पत्राद्वारे मीरा रोड पोलिसांना केली आहे. परंतु, पोलिसांकडून कारवाई होईल, असे वाटत नाही’, असे म्हणणे सातपुते यांनी मांडले.
तर ‘जानेवारीमधील नागपूरच्या कार्यक्रमात कोणतीही अनुचित घटना घडली नव्हती किंवा तक्रारही आली नव्हती. त्यामुळे मीरा रोड पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली. तरी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडून जातीने लक्ष राहणार असून संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडीओ चित्रिकरण केले जाणार आहे’, अशी माहिती सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी न्यायालयाला दिली.
त्यानंतर ‘ही याचिका प्रसिद्धीपोटी व राजकीय हेतूने केल्याचे दिसत आहे’, असे निरीक्षण नोंदवून खंडपीठाने ती फेटाळली. मात्र, त्याचवेळी कार्यक्रमात काहीही आक्षेपार्ह आढळल्यास कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.