अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली…….
मुंबई : हाता तोंडाशी आलेला शेतातला माल विकून आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने उष:काल येईल, अशी आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबात पुन्हा संकटाची काळरात्र आलीय. शेतकऱ्यांच्या आयुष्यात समाधान आणि आनंदाचा उष:काल होईल असं वाटत असतानाच आज पुन्हा त्याच काळरात्रीच्या दिशेला शेतकरी लोटला गेलाय. हा उष:काल उजाडण्याआधीच शेतकऱ्यांच्या नशिबात नको असलेल्या संकटाची काळ रात्र आलीय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. इतकी मेहनत केली, संघर्ष केला, यातना सोसल्या, वेळप्रसंगी अपमान सोसले, पण तरीही शेतकऱ्यांना पुन्हा पदरी यातनाच पडल्या आहेत. महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांवर हे संकट कोसळलंय
शेतातला माल हा शेतकऱ्याच्या आयुष्यातला खजिना असतो. शेतातलं पीक हे शेतकऱ्यांच्या आयुष्यातलं सोनं असतं. पण हाच खजिना अवकाळी पावसाने हिरावून नेला. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. शेतातला गहू, हरभरा, फळांच्या बागा पाहून आनंद आणि समाधान व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांचं एक दिवसात होत्याच नव्हतं झालंय. संपूर्ण पीकं जमीनदोस्त झाली आहेत. शेतातला माल विकून आपण आपल्या आयुष्याला आणखी चांगल्याप्रकारे जगू. सगळं कर्ज फेडू, मुलांचं चांगल्या शाळेत शिक्षण करु, मुलीचं लग्न करु, असे अनेक विचार शेतकऱ्यांच्या मनात होते. पण सारं जागेवर राहून गेलंय.
पाच एकर शेतातला गहू अक्षरश: आडवा
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सादलगावमधील एका शेतकऱ्याचा पाच एकर शेतातला गहू अक्षरश: आडवा झालाय. या गव्हाच्या उत्पन्नावर शेतकऱ्याने पुढची आर्थिक गणितं मांडली होती. मात्र अवकाळी पावसाने त्याची सर्व स्वप्न अक्षरश: धुळीस मिळवले. मायबाप सरकारने या शेतकऱ्यांच्या डोळ्यांचे अश्रू पुसावेत, अशी मागणी केली जाते