छ.संभाजीनगर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी त्यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोप प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघांविरोधात मानहानी केल्याचा दावा दाखल केला आहे. त्या दाव्याला आव्हान देणारा चित्रा किशोर वाघ यांचा दिवाणी पुनर्निरीक्षण अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळताना बीड दिवाणी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
मेहबूब शेख यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगरमधील सिडको पोलीस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील फिर्यादी महिलेनेच कालांतराने खोटी तक्रार दाखल केल्याची कबुली पोलीस तपासात दिल्यानंतर शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपली बदनामी केल्याचा दावा बीड दिवाणी न्यायालयात दाखल केला होता.
का फेटाळण्यात आला वाघ यांचा अर्ज
शेख यांचे फौजदारी प्रकरण प्रलंबित असल्यामुळे त्यांनी आपल्याविरोधात दाखल केलेला मानहानीचा दावा फेटाळण्यात यावा, असा अर्ज चित्रा वाघ यांनी दाखल केला होता. बीड दिवाणी न्यायालयाने वाघ यांचा अर्ज फेटाळला होता. त्याला आव्हानित करणारा दिवाणी पुनर्निरीक्षण अर्ज चित्रा किशोर वाघ यांनी खंडपीठात दाखल केला होता. तो अर्ज फेटाळण्यात आला.
जाहिरात