
बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल मिळताच पोलीस यंत्रणा अलर्ट; बीडीडीएस आणि श्वान पथकाकडून संपूर्ण न्यायालय परिसराची तपासणी पूर्ण, न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरू करण्याचा मार्ग मोकळा..

रत्नागिरी | दि. २ नोव्हेंबर २०२६- रत्नागिरी जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने सोमवारी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या दृष्टीने व्यापक उपाययोजना करत न्यायालय परिसरात सर्च ऑपरेशन हाती घेतले. तब्बल तीन ते चार तास चाललेल्या या तपासणी मोहिमेनंतर न्यायालयाच्या इमारतीत किंवा परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटके आढळून आली नसल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिली. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला असून तपासणी मोहीम थांबवण्यात आली आहे.
सोमवारी न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा संदेश प्राप्त झाला. न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारचा धमकीचा संदेश मिळाल्याने न्यायालयीन प्रशासनासह पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कोणतीही जोखीम न पत्करता तातडीने सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली. त्यानंतर न्यायालय परिसरात आवश्यक ती खबरदारी घेत तपासणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
दुपारी सुमारे दोन वाजल्यापासून पोलीस दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) तसेच श्वान पथकाच्या मदतीने संपूर्ण न्यायालय परिसराची सखोल तपासणी करण्यात आली. न्यायालयाची मुख्य इमारत, विविध कक्ष, आवार आणि परिसरातील प्रत्येक भागाची बारकाईने पाहणी करण्यात आली. सलग तीन ते चार तास ही तपासणी मोहीम सुरू होती. संभाव्य धोका लक्षात घेता पोलिसांनी संपूर्ण परिसराची काटेकोरपणे तपासणी केली.

अखेर दीर्घकाळ चाललेल्या या सर्च ऑपरेशनमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू, बॉम्ब किंवा स्फोटके आढळून आली नाहीत. त्यामुळे तपासणी मोहीम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण परिसर सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर न्यायालयाचे नियमित कामकाज पूर्ववत सुरू करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी स्पष्ट केले.
राजापूर न्यायालयालाही धमकीचा ई-मेल; तेथेही तपासणी सुरू
दरम्यान, रत्नागिरी जिल्हा न्यायालयाला धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याची घटना ताजी असतानाच राजापूर न्यायालयालाही अशाच स्वरूपाचा धमकीचा ई-मेल आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील न्यायालयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राजापूर येथेही पोलीस पथकाकडून आवश्यक ती तपासणी सुरू असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांनी सांगितले.
एकाच दिवशी जिल्ह्यातील दोन न्यायालयांना धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याने या प्रकाराकडे पोलीस प्रशासन गांभीर्याने पाहत आहे. धमकीचे ई-मेल कोणी आणि कोणत्या उद्देशाने पाठवले, याबाबत पुढील तपास महत्त्वाचा ठरणार आहे. अशा प्रकारच्या धमक्यांमुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम होण्याबरोबरच न्यायालयात येणारे पक्षकार, वकील, कर्मचारी आणि नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण होते.
अफवांवर विश्वास ठेवू नका; पोलीस प्रशासनाचे आवाहन
या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात असून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, धमकीचा ई-मेल हा केवळ खोडसाळपणा असला तरी अशा घटनांकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही. न्यायालयासारख्या महत्त्वाच्या संस्थांना वारंवार अशा प्रकारच्या धमक्या मिळणे ही चिंतेची बाब असून, अशा संदेशांमागील सूत्रधारांचा शोध घेऊन कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. रत्नागिरीतील तपासणीमध्ये काहीही संशयास्पद आढळले नसले, तरी राजापूरमधील तपासणी आणि धमकीच्या ई-मेलचा तपास याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर