रत्नागिरीत शाश्वत पाणी नियोजनाचा जागर; जलसंधारणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज!..

Spread the love

टँकरमुक्त आणि जलयुक्त गावांसाठी जलदूतांना प्रशासनाने सोबत घ्यावे; पाणी परिषदेत तज्ज्ञांचे महत्त्वपूर्ण आवाहन…

रत्नागिरी : भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईचे संकट वेळीच ओळखून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या ‘जिल्हा शाश्वत पाणी परिषदेत’ जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन, भूजल पातळी वाढविणे आणि सांडपाण्याचा पुनर्वापर या विषयांवर सखोल मंथन करण्यात आले. केवळ टँकरवर अवलंबून न राहता प्रत्येक गाव पाणीसमृद्ध आणि टँकरमुक्त करण्यासाठी प्रशासन, स्वयंसेवी संस्था, जलदूत आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज या परिषदेतून व्यक्त करण्यात आली.

रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित, हिरवळ प्रतिष्ठान आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन सभागृहात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या परिषदेला पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय साहुले, जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, तहसीलदार राजाराम म्हात्रे, डॉ. श्रीधर ठाकुरदेसाई, दादा दळी आदी मान्यवर उपस्थित होते. संजय वैशंपायन यांनी सूत्रसंचालन केले, तर नंदू तांबे यांनी प्रास्ताविक केले.

सांडपाण्यावर प्रक्रिया करा; भूजल पुनर्भरणाला प्राधान्य द्या!…

डॉ. उमेश मुंडले यांनी सांडपाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याच्या समस्येकडे लक्ष वेधले. गावागावांतील सांडपाणी ओढे आणि नाल्यांमध्ये सोडले जात असल्याने विहिरींच्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी शहरातील फणशी येथे २०१९ मध्ये ‘फ्लोटिंग रिडबेड सिस्टीम’च्या माध्यमातून बॅक्टेरियल कल्चर आणि वनस्पतींचा वापर करून सांडपाण्यावर यशस्वी प्रक्रिया करण्यात आली होती. अशा प्रकल्पांचा अधिक विस्तार करून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याच्या महागड्या तंत्रज्ञानापेक्षा पावसाचे पाणी टप्प्याटप्प्याने अडवून भूजल पातळी वाढविण्यावर भर देणे अधिक व्यवहार्य ठरेल, असे मतही त्यांनी मांडले.

पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्याचे आवाहन…

दापोलीचे जलतज्ज्ञ डॉ. प्रशांत परांजपे यांनी दैनंदिन जीवनातील पाणी बचतीच्या छोट्या सवयींचे महत्त्व अधोरेखित केले. हॉटेलमध्ये किंवा घरी पाहुण्यांना पूर्ण ग्लासाऐवजी आवश्यकतेनुसार अर्धा किंवा पाऊण ग्लास पाणी देणे, उरलेले पाणी फेकून न देता त्याचा योग्य वापर करणे अशा सवयी प्रत्येकाने अंगीकाराव्यात, असे त्यांनी सांगितले.

आगामी उन्हाळ्यात पर्यटन व्यवसाय आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन सुरळीत ठेवण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी ‘जलदूत’ आणि ‘जलयोद्धे’ म्हणून पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यावर होणाऱ्या परिणामांचाही त्यांनी उल्लेख केला. बहुमजली इमारतींमधील सांडपाणी आणि वातानुकूलित यंत्रणेतून बाहेर पडणारे पाणी संकलित करून त्याचा पुनर्वापर करण्याची व्यवस्था उभारण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

एसीमधील पाण्याचाही झाडांसाठी उपयोग!..

एका वातानुकूलित यंत्रणेतून रात्रीच्या वेळी साधारण पाच ते आठ लिटर पाणी बाहेर पडू शकते. हे पाणी वाया न घालवता संकलित करून झाडांसाठी वापरता येऊ शकते. तसेच इमारतींमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा फ्लशसाठी पुनर्वापर करण्याची व्यवस्था केल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते, असे डॉ. परांजपे यांनी स्पष्ट केले.

हॉटेल व्यावसायिकांकडूनही पाणी बचतीचे प्रयत्न…

हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांनी हॉटेल व्यावसायिकांकडून सुरू असलेल्या पाणी बचतीच्या उपाययोजनांची माहिती दिली. हॉटेलमधील ग्राहकांना आवश्यकतेनुसार पाणी देणे, टब बाथचा वापर टाळणे आणि एसीमधून बाहेर पडणारे पाणी झाडांसाठी वापरणे अशा सूचना हॉटेल व्यावसायिकांना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोकणात प्रथमच दुष्काळसदृश परिस्थिती जाणवत असल्याने पाणी जपून वापरण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

घराघरांत सांडपाण्याचा पुनर्वापर शक्य!..

डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी निवेंडी येथील स्वतःच्या घरात सांडपाण्याचा पुनर्वापर केला जात असल्याचे उदाहरण दिले. प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून आगामी सात महिने पाणी बचत करण्याबरोबरच पुढील पावसाळ्यात पावसाचे पाणी अडविण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. यातून भूजल पातळी वाढण्यास आणि पाण्याचा ताळेबंद राखण्यास मदत होईल. मात्र यासाठी शासन आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टँकरमुक्त गावांसाठी जलदूतांचा प्रशासनात सहभाग हवा!…

जिल्ह्यात शेकडो जलदूत आणि जलप्रेमी प्रत्यक्ष क्षेत्रात जलसंधारणाची कामे करत आहेत. ऑनलाइन बैठका आणि प्रत्यक्ष कामांच्या माध्यमातून हे कार्यकर्ते पाणी बचतीसाठी प्रयत्नशील आहेत. मात्र पंचायत समिती तसेच प्रशासनाच्या टंचाई आढावा बैठका आणि नियोजन प्रक्रियेत या अनुभवी कार्यकर्त्यांना सहभागी करून घेतले जात नसल्याची खंत चिपळूणचे शाहनवाज शहा यांनी व्यक्त केली.

केवळ टँकर मागविण्यापुरते उपाय मर्यादित न ठेवता ‘टँकरमुक्त आणि जलयुक्त गाव’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी जलसेवकांचा अनुभव आणि त्यांच्या कार्याचा उपयोग प्रशासनाने करून घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

जलसंधारणासाठी योगदान देणाऱ्या जलदूतांचा गौरव…

परिषदेत जलसंधारण आणि जलजागृतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा ‘जलसेवा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा एनएसएस विभाग, अनसूया महिला स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्ष नीलम पालव, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे, राहुल तिवरेकर, झेप फाउंडेशनचे अध्यक्ष परशुराम ढेकणे, देवरुखच्या चैत्राली धस, गुहागरचे आशुतोष जोशी, दापोलीचे डॉ. प्रशांत परांजपे, चिपळूणचे शाहनवाज शहा, मजगावचे फैय्याज मुकादम, डॉ. उमेश मुंडले, हातिस ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर आणि नगरपालिकेचे पाणी सभापती निमेश नायर यांचा समावेश होता.

पालकमंत्र्यांकडे सादर होणार पाणी नियोजनाचा आराखडा…

या परिषदेत मांडण्यात आलेल्या सर्व सूचना, उपाययोजना आणि महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा एकत्रित आराखडा तयार करून तो पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. जलसंधारणाची कामे, पारंपरिक जलस्रोतांचे जतन, पावसाच्या पाण्याचे संकलन, पाणीगळती रोखणे, भूजल पुनर्भरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाण्याचा पुनर्वापर या उपाययोजनांना प्राधान्य देण्यावर परिषदेत एकमत दिसून आले.

पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्यानंतर टँकरची व्यवस्था करण्यापेक्षा पाणी उपलब्ध असतानाच त्याचे योग्य नियोजन, संवर्धन आणि पुनर्भरण करणे हाच शाश्वत उपाय आहे. शासन, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास रत्नागिरी जिल्ह्याला भविष्यातील पाणीटंचाईपासून निश्चितच मोठा दिलासा मिळू शकतो, असा महत्त्वपूर्ण संदेश या पाणी परिषदेतून देण्यात आला.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page