कोकणच्या राजकारणातील चतुरंगी व्यक्तिमत्त्व माजी खासदार डॉ. निलेश नारायणराव राणे!

Spread the love

🛑जनशक्तीचा दबाव न्यूज | भांबेड (लांजा) | मार्च १७, २०२३.

🔸 आज दि. १७ मार्च रोजी डॉ. निलेशजी राणे यांचा वाढदिवस ! प्रथमतः साहेब, वाढदिवसाचे मनःपूर्वक अभिष्टचिंतन. कोकणच्या सर्वांगीण शाश्वत विकासाचा ध्यास घेऊन त्या दिशेने सातत्यपूर्ण मार्गक्रमण करणारे, कार्यकर्त्याच्या मागे खंबीरपणे उभे रहाणारे असे तरूण तडफदार व्यक्तिमत्त्व… संकटाच्या वेळी प्रत्येकाच्या मदतीला धावणारे, त्यामध्ये चिपळूणला आलेला महापूर असो की संपूर्ण कोकणातील ताऊक्ते वादळाने झालेली वाताहात; नागरिकांना धीर देत मदत करण्यात मा. निलेशजींचा मोलाचा वाटा होता. निलेशजींच्या खंबीर नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी उभारलेले कार्य, विविध ठिकाणी सभांमधून विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी आणि अखंड प्रवासाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याची प्रचंड क्षमता या सर्व गोष्टी डॉ. निलेश राणे साहेबांना प्रभावी नेता म्हणून सिद्ध करतात. राजकीय मंचावर बोलताना, नागरिकांशी चर्चा करताना आणि मूळ निलेशजी राणे यांच्यात वेगळेपणा राखण्याचे कसब गवसल्याने प्रत्येक ठिकाणी बघणाऱ्याला अचंबा वाटेल एवढे रंग त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहेत.

🔸 महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री मा. नारायणराव राणे साहेब यांच्याकडून त्यांना राजकीय वारसा लाभला. आजच्यासारखी समाजमाध्यमे आणि संसाधने १५ वर्षांपूर्वी उपलब्ध नसतानाही त्यांनी खासदार असताना लोकाभिमुख कार्य केले. त्यांच्या त्यावेळी केलेल्या कामांचा आजही लोकांकडून पुनरुच्चार होताना अनेक सभा आणि प्रवासादरम्यान पहायला मिळतो. अत्यंत आक्रमक असलेले निलेशजी पुढील दोन निवडणुकांमधील पराभव पचवून तडफेने पुन्हा तयारीला लागले, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करून जनतेच्या सेवेत पुन्हा रुजू झाले. कवी केशवसुतांच्या “जुने जाऊ द्या मरणालागूनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका” उक्तीप्रमाणे हा निडर योद्धा पुन्हा एकदा नव्याने मैदानात उतरला आहे.

🔸 भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या आक्रमकपणाला संयमाची जोड देत विरोधकांना वेळीच जागा दाखवणारे डॉ. निलेशजी राणे साहेब प्रदेश सचिव म्हणून कार्यभार सांभाळत असतानाच कोकणात प्रत्येक आघाडीवर अग्रेसर आहेत. त्यांची काम करण्याची पद्धती आणि कामाचा झपाटा या गोष्टी मी जवळून पाहत आहे. अभ्यासपूर्ण रोखठोक उत्तरे देण्यात त्यांचा हातखंडा आहे. ते कार्यकर्त्यांच्या अडचणींबाबत अत्यंत सजग असतात. कार्यकर्त्यांच्या अडचणी अचूकपणे हेरून त्यावर तात्काळ उपाययोजना करताना मी कित्येक वेळा पाहिले आहे. प्रखर हिंदुत्ववादी असूनही सर्वधर्मीय समाजांमध्ये त्यांची आपुलकीने उठबस असते. पुन्हा एकदा भारताच्या संसदेत कोकणाचा आवाज बुलंद करण्यासाठी, विकासाची गंगा दारोदारी आणण्यासाठी डॉ. निलेशजी राणेंसारखा नेता खासदार व्हावा अशी जनतेची इच्छा आहे. आणि लोकशाहीमध्ये जनतेच्या इच्छेचा प्राधान्याने विचार केला जातो. कार्यकर्त्यांनी मनावर घेतल्यास रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील राजकीय चिखलात निलेशजी राणे साहेबांच्या रुपाने भाजपाचे कमळ नक्कीच फुलेल अशी माझी खात्री आहे. पुन्हा एकदा आमचे नेते मा. निलेशजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आई तुळजाभवानीचरणी प्रार्थना करते!!

राजश्री (उल्का) विश्वासराव.
भाजपा उद्योग आघाडी महिला समिती सहप्रमुख- कोकण विभाग महाराष्ट्र प्रदेश.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page