
रत्नागिरी : जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी संपावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांशी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज एका बैठकीत चर्चा केली व त्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड उपस्थित होते. राज्यातील सरकारी कार्यालयांमधील 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजन लागू करण्याची मागणी करीत हे सर्व कर्मचारी संपावर आहेत. हा संपाचा निर्णय सरकारी संघटनेचा असून त्याबाबत राज्य स्तरावर निर्णय झाल्यावर संघटनेचा निर्णय असेल त्याप्रमाणे निर्णय घेऊ असे संपकऱ्यांच्या शिष्टमंडळाने यावेळी सांगितले. दरम्यान संपकाळात तत्कालीन सेवांवर परिणाम होवू नये यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी खबरदारी घ्यावी व कामाचे व्यवस्थापन करावे असे जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी आज अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले. संपकऱ्यांची बैठक घेऊन विभाग प्रमुखांनी त्यांना स्वतंत्रपणे आवाहन करण्याचे सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.