
चिपळूण : परशुराम घाटाला पर्याय म्हणून यावर्षीही चिरणीवरच भिस्त परशुराम घाटाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्यादृष्टीने हा घाट वाहतुकीसाठी किमान सात दिवस पूर्णपणे बंद ठेवावा लागेल. त्यामुळे या घाटातील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग असलेला चिरणी-आंबडस हा पर्यायी मार्ग पावसाळ्यापूर्वी सुसज्ज करण्यात येईल. तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया प्रलंबित आहे, ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांना देण्यात येतील असेही बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत जी काही रखडलेली कामे शिल्लक आहेत ते लवकर पूर्ण करण्याच्यादृष्टीने युद्धपातळीवर काम करण्यात येतील. नॅशनल हायवे ऍथोरिटी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांमध्ये योग्य समन्वय राखण्याच्या सूचना मुंबईत झालेल्या बैठकीच्यावेळी मंत्री ना. चव्हाण यांनी दिल्या. तसेच जे काम अपूर्ण राहिले आहे, त्या सर्व कामांची प्रगती पाहण्याच्यादृष्टीने या कामाचे शुटींग ड्रोनच्या सहाय्याने करण्याचे निर्देश मंत्री चव्हाण यांनी यावेळी दिले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉटस आहेत ते काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.
