
संगमेश्वर/प्रतिनिधी- संगमेश्वर येथील पैसा फंड हायस्कूलमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या वतीने ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कायदेशीर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यापारी पैसा फंड सोसायटीचे सचिव धनंजय शेट्ये यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा प्रमुख मार्गदर्शक राजेंद्र पाटील यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच मुख्याध्यापक सचिनदेव खामकर यांनी ॲड. अमित शिरगावकर यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना प्रमुख मार्गदर्शक राजेंद्र पाटील यांनी ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियानाचे महत्त्व विशद केले. “स्त्री भ्रूणहत्या हा एक गंभीर सामाजिक गुन्हा असून, कायद्याने यासाठी अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद आहे. समाजातील प्रत्येक घटकाने याविषयी जागरूक राहणे काळाची गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले.

ॲड. अमित शिरगावकर यांनी ‘पोक्सो ॲक्ट’ (बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण) या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कायद्याची उद्दिष्टे, शिक्षेची व्याप्ती आणि बालकांच्या संरक्षणासाठी पालक, शिक्षक व समाजाची नेमकी काय जबाबदारी आहे, हे त्यांनी सोप्या भाषेत पटवून दिले. “आपण कुठे शिकतो यापेक्षा कसे शिकतो हे महत्त्वाचे आहे,” असे सांगत त्यांनी मूल्यधारित शिक्षणावर भर दिला.
या प्रसंगी कायदा साथी दिनेश अंब्रे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चित कोकाटे यांनी केले, तर पर्यवेक्षक प्रकाश दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️🔸️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*