
*मुंबई-* महापौर पदाच्या आरक्षण सोडतीत योग्य पत्ते पडले तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच उमेदवार महापौर होईल असा नवा दावा केला जात आहेत. या प्रकरणी कोणत्याही पक्षाकडे नाहीत असे दोन हुकमी एक्के ठाकरे गटाकडे आहेत. त्यामुळे या चर्चेला ऊत आला आहे. उद्धव ठाकरे यांनी 2 दिवसांपूर्वीच देवाची इच्छा असेल तर आपलाच महापौर होईल हे विधान केले होते हे विशेष.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 89 जागा मिळाल्या आहेत. तर ठाकरे बंधूंना 71 जागा मिळाल्या आहेत. सत्ताधारी शिवसेना 29 जागा जिंकत थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेली आहे. आता निवडणुकीनंतर फोडाफोडी होण्याच्या भीतीने एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात हलवले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत उद्धव ठाकरेंचाच महापौर होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
*ठाकरेंचाच महापौर होईल याचे गणित काय?*
येत्या 22 जानेवारीला महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर होणार आहे. त्यात कोणत्या प्रवर्गाचा महापौर मुंबईच्या खुर्चीत विराजमान होणार? हे स्पष्ट होणार आहे. निवडणुकीपूर्वी नगरसेवकांसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये 2 जागा अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यानुसार 53 व 121 हे 2 प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले होते. या दोन्ही प्रभागांत सर्वच पक्षांनी उमेदवार दिले. पण दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे आरक्षण सोडतीत महापौर पद एसटीला सुटले तर त्यावर ठाकरे गटाचा उमेदवार बसेल हे निश्चित आहे.
*एसटीच्या राखीव जागांवर कोण निवडून आले?…*
महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 53 व प्रभाग क्रांक 121 हे दोन प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. त्यात प्रभाग क्रमांक 53 मधून ठाकरे गटाच्या जितेंद्र वळवी यांनी शिंदे गटाच्या अशोक खांडवे यांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक 121 मध्येही ठाकरे गटाच्याच प्रियदर्शनी ठाकरे यांचा विजय झाला. त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवार प्रतिमा खोपडे यांचा पराभव केला. इतर कोणत्याही पक्षाकडे अनुसूचित जमातीचा उमेदवार नाही. त्यामुळे दैवाने साथ दिली तर मुंबई महापालिकेचे महापौर पुन्हा ठाकरे गटाकडे चालत येईल.
*देवाची इच्छा असेल तर आपलाच महापौर होईल – उद्धव ठाकरे*
उल्लेखनीय बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधला. त्यात त्यांनी देवाची इच्छा असेल तर महापौर आपलाच होईल असे विधान केले होते त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली होती. याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. विशेषतः मुंबई महापालिकेत ठाकरे गट व भाजपची युती होणार का? असा प्रश्नही या प्रकरणी उपस्थित केला जात होता.
त्यावर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. देवाच्या मनात म्हणजे मी नाही. महापौर महायुतीचाच होईल हे वरच्या देवाने ठरवले आहे, असे ते म्हणाले होते. असे असले तरी महापौर पदाच्या आरक्षण सोडतीतच नेमके महापौर पद कोणत्या प्रवर्गाला सुटेल व त्यावर कोण विराजमान होणार हे स्पष्ट होणार आहे.
*खाली पाहू मुंबई महापालिकेचे पक्षीय बलाबल…*
*भाजप -89*
*ठाकरे गट- 65*
*शिंदे गट- 29*
*काँग्रेस- 24*
*मनसे -06*
*एमआयएम- 08*
*एनसीपी (अजित पवार) -03*
*सप- 02*
*एनसीपी (शरद पवार)- 01*
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*