
*सत्ता मिळवण्याइतक्या नसल्या तरी सन्मानजनक संख्येत जागा जिंकत चाळीस जागांच्या आत ठाकरेंचा कारभार आटपेल, असं भाकीत करणाऱ्या विरोधकांना ठाकरे यांनी उत्तर दिलं.*
*मुंबई :* महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपा आणि शिवसेना महायुतीनं वरचष्मा राखला. सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका महत्त्वाच्या असल्या तरी चर्चेचं केंद्र असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निकालांचं विश्लेषण करणं संयुक्तिक ठरतं. मुंबई महानगरपालिकेची शेवटची निवडणूक 2017 साली झाली होती. नियमाप्रमाणे पाच वर्षांनी म्हणजे 2022 साली ती व्हायला हवी होती. मात्र अनेक राजकीय आणि ‘अ’राजकीय कारणांमुळं ती रखडली. अखेर नियोजित वेळेच्या तीन वर्षांनंतर ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडली. या मुंबई महानगरपालिका निवडणुकीला अनेक पदर आहेत.
*जगातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका :*
74 हजार कोटी रुपयांचं बजेट असलेल्या म्हणजे आशिया खंडातल्या सर्वात श्रीमंत अशा मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या मधल्या काही वर्षांचा अपवाद वगळता (एकसंध) शिवसेनेकडे होत्या. शिवसेनेचे सरळ दोन तुकडे झाल्यानंतर ही महानगरपालिका टिकवण्यात आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यश येईल का? हा कळीचा प्रश्न होता. तसंच मुंबईतले मतदार जुन्याला कौल देतात की नव्याला संधी? या प्रश्नाचं उत्तर या निवडणुकीत मिळायचं होतं. राज्याचे मुख्यमंत्री असलेले भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि अर्थातच अर्धी-अधिक शिवसेना स्वतःबरोबर नेणारे, शिवसेना पक्षावर दावा सांगणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिष्ठेची लढाई केली होती.
*महाराष्ट्र भाजपाला मिळालेला हा विजय कौतुकास्पद – मुख्यमंत्री :*
मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील दृष्टीक्षेपात आलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यालयात दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी म्हटलं की, महाराष्ट्र भाजपाला मिळालेला हा विजय कौतुकास्पद आहे. जनतेनं दिलेल्या कौलाबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानतो. मुंबईत महायुतीला बहुमत मिळणार असून, राज्यातील 29 पैकी 25 महापालिकांमध्ये भाजपाची सत्ता येईल. हे यश विक्रमी आहे. जनतेनं विकासाला मतदान केलं आहे.दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता, याचं स्मरण मी यावेळी करतो. तसंच, व्यापक हिंदुत्ववादी जनमत आम्हाला लाभलं आहे. याचबरोबर, विजय मिळाल्यानंतर उन्माद नको, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
*महायुती जिंकली पण ठाकरे हरले का? :*
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी सर्व मतभेद विसरुन तब्बल वीस वर्षांनी एकत्र आले. उद्धव-राजसह आदित्य आणि अमित या ठाकरे कुटुंबाच्या पुढच्या पिढीच्या शिलेदारांनीही प्रचाराची राळ उठवली. ठाकरे बंधूंच्या सभांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचं प्रतिबिंब मतदानात दिसलंच नाही का? याचं उत्तर शिवसेना (उबाठा) प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिलं. ते म्हणाले, “निकालावर अद्याप प्रतिक्रिया देण्याची वेळ आलेली नाही. मुंबईत ज्या प्रकारे मतमोजणी सुरू आहे, ते पाहता अंतिम निकाल मध्यरात्रीपर्यंत लागणार नाही. समोर येणारी आकडेवारी चुकीची आहे. जवळपास 100 प्रभागांमध्ये तर अजून मतमोजणी सुरूही झालेली नाही. तरीही मी हे मान्य करतो की, ही एक अटीतटीची लढत आहे. पण काही लोक दावा करत करत आहेत की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खूप मागे आहे, तर हे खरं नाही. तुम्ही आता जी आकडेवारी पाहत आहात, ती बदलेल. आमचे 60 नगरसेवक शिंदे गटात सामील झाले होते. त्यापैकी जवळपास सर्वच जण हरले आहेत. कदाचित हा सामना अनिर्णित अवस्थेत संपू शकतो.” दरम्यान, राऊत यांच्या तर्काला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला एकनाथ शिंदे यांच्या पक्षापेक्षा मिळत असलेल्या जास्त जागांचा संदर्भ आहे. 15 जानेवारीला मतदान झाल्यानंतर निवडणुकीवर एक्झिट पोल करणाऱ्या अनेक संस्थांनी महायुतीला मुंबईत भक्कम बहुमत मिळेल, असं सुचवणारे आकडे सांगितलं होतं. महायुतीला बहुमत मिळालं, पण एक्झिट पोल्सच्या सांगितल्याप्रमाणे ठाकरे बंधूंचा दारुण पराभव मात्र झाला नाही. महायुती जिंकली असली तरी त्याचा अर्थ ठाकरे हरले असा सरसकट घेता येणार नाही.
*ठाकरे आडनावाचं वलय :*
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे आडनावाला असलेलं वलय त्यांचे विरोधकही मान्य करतात. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीच्या यशाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र ‘ठाकरे’ हा ब्रँड बाळासाहेबांबरोबरच संपला, असंही विधान त्यांनी जाहीर सभेत केलं होतं.
शिवसेनाप्रमुखांच्या पूर्वपुण्याईवर ठाकरे ब्रँड जिवंत ठेवण्याचं आव्हान उद्धव-राज या ठाकरे बंधूंनी पेलण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात ते तोंडघशी पडले नाहीत. सत्ता मिळवण्याइतक्या नसल्या तरी सन्मानजनक संख्येत जागा जिंकत चाळीस जागांच्या आत ठाकरेंचा कारभार आटपेल, असं भाकीत करणाऱ्या विरोधकांना ठाकरे यांनी उत्तर दिलं. राजकीयदृष्ट्या अडगळीत पडत असताना ठाकरे बंधूंना पुन्हा भरारी घेण्याची संधी या निवडणुकीनं दिली.
*ठाकरेंना धडा शिकवणारी निवडणूक – सोमय्या :*
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या जनतेनं ठाकरेंना धडा शिकवला, असा शेरा मारत यावर प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, “मुंबईकरांना अनेक वर्षांपासून खूप काही करायचं होतं, पण ही माफिया टोळी, मग ते राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे. मुंबईकरांना धमक्या देऊन घाबरवत असत. आज मुंबईच्या जनतेनं त्यांना धडा शिकवला आहे. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या वडिलांचा विश्वासघात केला. शेवटी उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा कोणी वाचवली होती? मुस्लीम आणि बांगलादेशींनी. शेवटी त्यांना अल्लाहचाच आसरा घ्यावा लागला.”
*मराठी भाषा आणि मराठी माणूस :*
मुंबईचा उल्लेख मुंबईकर ‘आमची मुंबई’ असा करतो. मुंबई म्हणजे मराठी माणूस हे घट्ट असलेलं समीकरण काही वर्षांपासून बदलायला सुरुवात झाली आणि हा निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा झाला. मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. मराठी माणूस मुंबईतून विस्थापित होण्याच्या मार्गावर आहे. हे मुद्दे उपस्थित करून मराठी अस्मितेला साद घातली गेली. केंद्र आणि राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनीही त्यांच्या विरोधकांचा हा मुद्दा गैरलागू असल्याचा दावा केला. महाराष्ट्रात हे मुद्दे उपस्थित राहणं, ही मराठी माणसाबरोबरच राजकारण्यांसाठीदेखील धोक्याची घंटा आहे, याचं भान राजकारण्यांना या निवडणुकीच्या निमित्तानं राजकारण्यांना आलं. महाराष्ट्रात मराठी महापौर होणारच हे आश्वासन दोन्ही देण्याची वेळ दोन्ही बाजूंवर आली, हे विशेष.
*लोकशाही आणि बोटावरची ‘शाई’ :*
मतदान केल्यानंतर मतदान केल्याची नोंद म्हणून मतदारांच्या बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईची जागा या निवडणुकीत मार्कर पेननं घेतली. मार्कर पेननं केलेली नोंद (शाई) तासाभरात, त्या नंतरही पुसली जातेय, हे समाजमाध्यमांमधून मतदारांनी व्हायरल केलं. शेवटी निवडणूक आयोगालाही चूक मान्य करत नमतं घ्यावं लागलं. या प्रकारांमुळे आधीच आरोपांची फैरी झेलणाऱ्या निवडणूक आयोगाची भंबेरी उडाली.
*बिनविरोधचा अजब पॅटर्न :*
यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये विशेषतः ठाणे, कल्याण-़डोंबिवलीत बिनविरोध उमेदवार निवडून येण्याचा पॅटर्न पाहायला मिळाले. एकूण 67 उमेदवार बिनविरोध निवडून आले. प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज बाद करणं, उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास प्रवृत्त करणं, मोठ्या रकमेचं प्रलोभन देणं असे आरोप झाले. दक्षिण मुंबईत तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही तिथल्या उमेदवारांनी गंभीर आरोप केले. एकाच कुटुंबातून तीन जण निवडणूक लढवत असल्यामुळे टीकेचं लक्ष्य बनलेल्या राहुल नार्वेकरांनी स्वतःचं उत्तम वकिली ज्ञान वापरुन स्वतःवर आणि पक्षावर होणारी टीका थोपवली. यात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही हस्तक्षेप करावा लागला होता.
*आता पुढं काय? :*
वैभवशाली इतिहास असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा पुढचा प्रवास कसा होणार? ही मुंबई आपलीच आहे, हा विश्वास मराठी माणसाच्या मनात कायम ठेवण्याचं आव्हान पालिकेतले कसा पेलणार? आशियातल्या सर्वात श्रीमंत महापालिकेमार्फत महानगरी मुंबईत यापुढे किती विकासकामं होणार? या प्रश्नांची उत्तरं देण्याचं आव्हान महानगरीच्या नव्या कारभाऱ्यांना देण्यासाठी सज्ज रहावं लागणार आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*