
संगमेश्वर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात होणारी प्रचंड दिरंगाई आणि रस्ते दुरवस्थेच्या निषेधार्थ संगमेश्वरमध्ये काढण्यात आलेली ‘शासनाची तिरडी यात्रा’ आंदोलन कार्यकर्त्यांना महागात पडले आहे. जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अशोक जाधव, युयुत्स आर्ते यांच्यासह ३० ते ३५ कार्यकर्त्यांवर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी रविवारी (दि. ११ जानेवारी २०२६) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जनआक्रोश समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आंदोलकांनी पारेख पेट्रोल पंप, संगमेश्वर बाजारपेठ ते संगमेश्वर एस.टी. स्टँड असा विनापरवाना मोर्चा काढला. यावेळी शासनाच्या कामाचा निषेध म्हणून ‘तिरडी यात्रा’ काढण्यात आली.
आंदोलकांनी मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर एस.टी. स्टँड चौकात सुमारे तासभर रस्ता रोखून धरला. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि पोस्टरबाजी करत आपला संताप व्यक्त केला.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), (३) नुसार प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशानुसार विनापरवाना जमाव जमवणे किंवा मोर्चा काढण्यास बंदी आहे. असे असतानाही कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
अशोक जाधव (कोसुम, देवरुख), युयुत्स आर्ते (देवरुख), सुरेंद्र सुभाष पवार (मुंबई), रुपेश रामचंद्र दर्गे (पनवेल), अनिकेत प्रदीप मेस्त्री (मुंबई), संजय अनिल जंगम (घाटकोपर, मुंबई) यांच्यासह इतर ३० ते ३५ अनोळखी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हवाल्दार किशोर महादेव जोयशी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९, १९०, १२६(२) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ नुसार गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*