
चिपळूण:- लोटे औद्योगिक वसाहतीमधील बहुचर्चित लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात काँग्रेसच्यावतीने कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यानंतर कंपनी व्यवस्थापनाने आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांशी कार्यालयात बोलावून चर्चा केली. मात्र, यावेळी उपस्थितांचे समाधान झाले नाही. अखेर जोपर्यंत स्थानिक ग्रामस्थांचे प्रश्न आणि समस्यांचे निराकरण होत नाही तसेच आयआयटी दर्जाच्या तज्ज्ञांची चौकशी समिती नेमून अहवाल येत नाही तोपर्यंत ही कंपनी बंद ठेवावी; अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिला आणि यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिकच्या ‘पीफास’ या उत्पादनसंदर्भात अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत. सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये त्याची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली होती. गुरुवारी (दि.8) लोटेतील एक्सल फाटा येथे आंदोलक हातात राष्ट्रध्वज घेऊन सहभागी झाले आणि कंपनी विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. एक्सल फाटा येथून घोषणा देत आंदोलनकर्ते कंपनीच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. ‘बंद करा, बंद करा लक्ष्मी ऑरगॅनिक बंद करा’ अशा घोषणा देण्यात आल्या. गुरुवारी सकाळी 11 वा. हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी कंपनी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त होता. खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. सणस यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माजी खा. हुसेन दलवाई यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. यामध्ये उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, भरत लब्धे, अशोक जाधव, इब्राहिम दलवाई, उल्का महाजन, निर्मला जाधव, नगरसेवक साजिद सरगुरोह, सफा गोठे, मिसबाह नाखुदा, मुजफ्फर सय्यद, सुमती जांभेकर, राजन इंदुलकर, रविना गुजर, राम रेडीज, सुबोध सावंतदेसाई, सतीश कदम, रामदास घाग तसेच संदीप फडकले आदींसह लोटे परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. पोलिसांनी सुरुवातीला प्रवेशद्वारावर आंदोलनकर्त्यांना अडविले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बंद बंद करा, लक्ष्मी ऑरगॅनिक बंद करा, कंपनीला टाळे लावला अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर आंदोलनकर्त्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्याची मागणी केली. यानंतर पोलिसांनी शिष्टमंडळाला कंपनी कार्यालयात बोलावून घेतले. त्या ठिकाणी कंपनी व्यवस्थापन व आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी दलवाई यांनी मोर्चा काढण्यामागच्या भावना व्यक्त केल्या. हा मोर्चा म्हणजे कोकणच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. पीफास उत्पादन येथे होत असल्याने मानवाला धोका आहे. खेड, लोटे परिसरातील अशा अनेक कंपन्या आहेत. त्यांनी सांडपाणी सोडण्यासाठी बोअर मारल्या आहेत. परिसरातील नद्या, नाले प्रदूषीत झाल्या आहेत. पीफासमुळे अनेक रोग उद्भवत आहेत. तसे अहवाल आहेत. त्यामुळे हे उत्पादन बंद करावे, अशी मागणी केली. यावेळी कंपनी व्यवस्थापनाकडून उपस्थित अधिकारी श्री. पाटोळे तसेच मुंबई येथून आलेले अधिकार्यांनी कंपनीच्या उत्पादनाबाबत माहिती दिली. मात्र, त्या बाबत उपस्थित आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. अधिकारी कंपनीचीच बाजू मांडणार, अशी भूमिका घेत आंदोलनकर्ते उदय घाग, भरत लब्धे, अशोक जाधव, पंकज दळवी यांनी आक्षेप घेत या कंपनीत घडलेल्या दुर्घटनांबाबत विषय मांडला. राजू आंब्रे, महेश गोवळकर व अन्य स्थानिक ग्रामस्थांनी कंपनीत घडलेल्या अपघाताबाबत माहिती विचारली व खुलासा मागितला. मात्र, कंपनीच्या अधिकार्यांकडून देण्यात आलेल्या खुलाश्याने त्यांचे समाधान झाले नाही. सध्या कंपनीत 120 कर्मचारी कार्यरत असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. त्यामुळे आम्हीदेखील येथे काम करीत आहेत. मात्र, सर्वनियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. पीफासचे तीन टँकर येथून तळोजाला पाठविण्यात आले. या टँकरवर जीपीआरएस असतो. तळोजा येथे पोहोचल्यावर नोंद घेतली जाते. एमपीसीबी व अन्य खात्यांचे त्यावर नियंत्रण असते असे सांगितले. मात्र, उपस्थितांचे समाधान झाले नाही. काँग्रेस जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी, जर पीफास मानवाला घातक असेल तर त्याचे उत्पादनच का केले जाते आणि ते येथेच का केले जाते असा मुद्दा मांडला. यावर समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
आंदोलनकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांना धारेवर धरले. कोल्हापूर येथील अधिकारी आंदोलनाच्या निमित्ताने येणार होते, ते का आले नाहीत? असा सवाल केला. यावर अधिकारी निरुत्तर झाले. यावेळी उपस्थितांनी कंपनी व्यवस्थापनाला देखील धारेवर धरले. खेडचे नायब तहसीलदार श्री. इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. सणस या चर्चेवेळी उपस्थित होते. अखेर माजी खा. हुसेन दलवाई यांनी या बैठकीदरम्यान कोणतेही समाधान झाले नाही. जोपर्यंत स्थानिक ग्रामस्थ व लोकांच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, त्यांचे शंका निरसन होत नाही तोपर्यंत कंपनी बंद ठेवावी आणि आयआयटी दर्जाच्या तज्ज्ञांची समिती नेमावी आणि त्यांच्याकडून अहवाल घ्यावा आणि त्यानंतरच ही कंपनी सुरू करावी, अशी मागणी नायब तहसीलदार इंगळे यांच्याकडे केली. जर याची दखल घेतली नाही तर भविष्यात स्थानिक ग्रामस्थांना बरोबर घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*