सुप्रिया सुळे म्हणाल्या- गौतम भाई मोठ्या भावासारखे:अदानी म्हणाले- शरद पवार माझे मार्गदर्शक, तर अजितदादा म्हणाले- मोठं झाल्यावर लोक टीका करतात…

Spread the love

बारातमी- “गौतम भाई आणि प्रीती भाभी हे माझ्यासाठी केवळ पाहुणे नसून, ते माझ्या हक्काच्या मोठ्या भावासारखे आणि वहिनीसारखे आहेत. गेल्या 30 वर्षांपासून आमचे प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अदानी कुटुंबाविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात गौतम अदानी आणि प्रीती अदानी यांचे स्वागत करताना त्या बोलत होत्या.

बारामतीमध्ये शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचे आज उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून गौतम अदानी हे उपस्थित होते. यावेळी गौतम अदाणी यांच्या पत्नी देखील सोबत होत्या. त्याचबरोबर शरद पवारांसह अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरच्या उद्घाटनावेळी सुप्रिया सुळे यांनी गौतम अदाणी यांच्या कार्याचे कौतुक केले.

नेमके काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?..

सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात गौतम अदानी आणि प्रीती अदानी यांचे मनापासून स्वागत केले. ‘गौतम भाई आणि प्रीती भाभी माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आणि वहिनीसारखे आहेत, असे म्हणत त्यांनी अदानी कुटुंबाशी असलेल्या ३० वर्षांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा उल्लेख केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, कधी आयुष्यात चांगली, गोड किंवा कडुही बातमी मी हक्काने कुठल्या भावाला सांगते, तर या भावाला (गौतम अदाणी) सांगते. कधी कधी ते मला हक्काने रागावतातही, तर कधी माया देखील करतात. असे आमचे प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते आहे. आज गौतम भाई देशात नाही, तर जगामध्ये यशस्वी झालेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. गौतम भाईंचा सुरुवातीपासूनच संघर्ष आम्ही कुटुंब म्हणून फार जवळून पाहिलेला आहे.

एआयच्या युगात ‘मायेची थाप’ महत्त्वाची…

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (AI) भाष्य करताना सुप्रिया सुळे यांनी तंत्रज्ञान आणि मानवी संवेदना यांची तुलना केली. “आजच्या युगात कॉम्प्युटर कितीही प्रगत झाला, तरी तो कधीही शिक्षकाची जागा घेऊ शकणार नाही. कारण तो संस्कार आणि मायेची थाप देऊ शकत नाही. तसेच संसदेतील भाषणांसाठी चॅट जीपीटीचा वापर कसा होतो, याचाही त्यांनी किस्सा सांगितला. अदानी ग्रुप आणि विद्या प्रतिष्ठान यांच्यातील कराराद्वारे संशोधन आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अजित पवारांकडूनही गौतम अदाणींचे कौतुक…

गौतम भाई नेहमीच बारामतीत येतात. पवार साहेबांना दिवाळी शुभेच्छा द्यायला ते येतात. त्यांचे आज पुन्हा बारामतीत आगमन झाले त्यांचे तमाम बारामतीकरांकडून मी मनापासून स्वागत करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात सुरुवात होते. लोकं मोठे झाल्यावर आरोप करतात, टीका-टिप्पणी करतात पण आपण आपले काम करत राहायचे असते. माझ्या माहितीप्रमाणे 1990 च्या दशकात ही एमआयडीसीची 40 एकर जागा घेतली आणि नक्षत्र उद्यानसह टप्प्याटप्याने विकासकामे होत गेली. आज मानाचा तुरा त्यात रोवला गेलाय. ते ‘शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या केंद्राचे उद्घाटन होय. ज्याची खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील तरुण तरुणांसाठी गरज होती. असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

शरद पवार हे माझे मार्गदर्शक- गौतम अदाणी..

“शरद पवारांना गेल्या तीन दशकांहून अधिक काळ ओळखणे हे माझे भाग्य आहे आणि त्यांच्याकडून मी जे काही शिकलो ते अतुलनीय आहे. ज्ञानापलीकडे, त्यांची समजूतदारपणा आणि सहानुभूती ही सर्वात खोलवरची छाप सोडते. मी अनेक वेळा बारामतीला भेट दिली आहे आणि शरद पवार यांनी येथे जे साध्य केले आहे ते विकासापेक्षा खूप जास्त आहे. त्यांच्यासारखा नेता चांगले राजकारण काय असते हे दाखवतो. त्यांनी शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणले आहे, सहकारी संस्थांना बळकटी दिली आहे आणि उद्योजकतेला चालना दिली आहे,” असे गौतम अदाणी यांनी म्हटले.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page