
ठाणे: दिवा परिसरात गेल्या दहा दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भाजपने गुरुवारी दिवा प्रभाग समिती कार्यालयाच्या दारातच कचरा फेकत आंदोलन छेडले.
दिवा विभागात गेल्या ८ ते १० दिवसांपासून कचरा उचलण्याचे काम ठप्प असल्यामुळे संपूर्ण परिसरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. परिणामी रस्त्यांवरून चालणेही नागरिकांना कठीण झाले असून दुर्गंधीमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनाच्या घनकचरा विभागाकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप दिवा-शीळ मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांनी केला.
प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध म्हणून गुरुवारी मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांच्या नेतृत्वाखाली, शहर उपाध्यक्ष विजय भोईर, महिला मोर्चा अध्यक्षा सपना भगत, रोशन भगत, प्रवीण पाटील, नितीन कोरगावकर, साधना सिंह, पुनम सिंह, अनुराग पाटील, विजय वाघ, कल्पेश सारस्वत, तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिवा विभागातील कचरा गोळा करून तो थेट घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यालयासमोर टाकला. पालिका प्रशासनाने तत्काळ कचरा उचलण्याची कार्यवाही सुरू न केल्यास अधिक आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
कळवा आणि मुंब्र्यातील कचरा कोंडीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने थेट ठामपा मुख्यालयात आंदोलन केलं. त्यापाठोपाठ दिव्यात आज भाजपने देखील आंदोलन केल्याने निवडणुकीआधीच कचरा प्रश्न पेटणार असल्याचे दिसत आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर