
*रत्नागिरी :* भारतीय तटरक्षक दलाच्या महाराष्ट्र मुख्यालयाच्या समन्वयाने १९ आणि २० नोव्हेंबरला महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर एक व्यापक व संयुक्त असे किनारपट्टी सुरक्षा सराव ‘सागरकवच ०२/२५’ यशस्वीरित्या राबवण्यात आले. या सरावाद्वारे विविध सुरक्षा संस्थांमधील उच्च दर्जाचा समन्वय, कार्यान्वित सज्जता आणि सागरी सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या तसेच समुद्रीमार्गाने महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रतिष्ठापनांवर आणि मालमत्तांवर राष्ट्रविरोधी घटकांकडून होणाऱ्या देशविघातक घटकांकडून संभाव्य हल्ल्यांचा सामना करण्याची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली.
या सागरी आणि तटीय कवायतीमध्ये भारतीय तटरक्षक दलासह इतर १३ केंद्रीय आणि ९ राज्यस्तरीय संस्था ज्यात भारतीय नौदल, राष्ट्रीय सुरक्षारक्षक, भारतीय आर्मीची १५ जैक ली जेएके एलआय, किनारा सुरक्षा पोलिस, होमगाईस, राज्य पोलिस, रेल्वे संरक्षण दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षादल, सीमाशुल्क, मुंबई पोर्ट ट्रस्ट, जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी, १६ छोटी बंदरे, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, राज्य गुप्तचर विभाग/विशेष गुप्तचर विभाग, तेल हाताळणी एजन्सी, मत्स्य व्यवसाय विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या सरावासाठी व्यापक अशी सागरी आणि हवाई साधनसामग्री तैनात करण्यात आली होती, ज्यामुळे समुद्र, हवा आणि किनाऱ्यावर बिनचूक समन्वय साधला गेला. यामध्ये भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या जहाजांसह डॉर्नियर विमाने, चेतक हेलिकॉप्टर्स आणि एअरकुशन व्हेईकल्स म्हणजेच होवरक्राफ्ट्स यांचा समावेश होता. मरिन पोलिस, कस्टम्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षादल, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, पोलिस आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या बोटीदेखील यात सहभागी झाल्या होत्या, ज्यामुळे संपूर्ण कवायतीदरम्यान मजबूत सुरक्षाव्यवस्था राखली गेली.
या नियोजित सरावामध्ये ४ हजाराहून अधिक कर्मचारी आणि ८०हून अधिक नौका व विमाने सहभागी झाले होते. या व्यापक सरावाचे नियोजन १० ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सर्व भागधारकांच्या उपस्थितीत मुंबई येथे मंत्रालयात आयोजित प्रारंभिक नियोजन बैठकीमध्ये करण्यात आले.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर