‘पाटील जे शिव्या खातात तेच..’, भाजपकडून अनगरच्या पाटलांचं कौतुक, राष्ट्रवादीकडून माज उतरवण्याची भाषा…

Spread the love

“पाटलाला माफी नाही. आमच्याकडे चुकीला माफी नाही. अनगरच्या पाटलाचा माज आम्ही उतरवणार” अशा शब्दात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यानं बाळराजे राजन पाटील यांना आव्हान दिलं आहे.

नागपूर- सध्या महाराष्ट्रात अनगर नगरपरिषद निवडणुकीची चर्चा आहे. कारण भाजपने ही निवडणूक बिनविरोध जिंकली. अनगर नगरपरिषदेत 17 पैकी 17 जागा भाजपने जिंकल्या. आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील नगराध्यक्षपदी निवडून आल्या. त्यामुळे राजन पाटील यांचं नाव मागच्या आठ दिवसांपासून सोशल मीडिया आणि माध्यमात चर्चेत आहे. अनगरच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप यांचे स्थानिक पातळीवरील नेते परस्पराविरोधात आक्रमक झाले आहेत. थेट आव्हानाची भाषा सुरु आहे. “पाटलाला माफी नाही. आमच्याकडे चुकीला माफी नाही. अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार” असं आव्हान उमेश पाटील यांनी दिलं. ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. राजन पाटील आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र नगरपरिषद निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांनी पक्ष बदलला.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात ही अनगर नगर परिषद आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी आमदार राजन पाटील यांचे कौतुक करताना उमेश पाटील यांच्यावर खोचक टीका केली. ‘राजन पाटील यांचे नाव दिल्ली, अमेरिकेत गेले’ अशा शब्दात जयकुमार गोरे यांनी राजन पाटील यांचे कौतुक केले. ‘पिवळं दिसतं ते सोनं नसतं, बेन्टेक्स असतं’ अशा शब्दात उमेश पाटलांचे नाव न घेता टीका केली. “महाराष्ट्र ते दिल्ली आणि दिल्लीपासून अमेरिकेपर्यंत नाव झालं. अमेरिकेतले लोकही म्हणतात, अनगर कुठे आहे? आणि राजन पाटील कोण आहेत?” असं जयकुमार गोरे म्हणाले.

त्यावर राजन पाटील यांनी खालून आवाज देताना म्हणले, ‘किती शिव्या खातोय’.जयकुमार गोरे म्हणाले की,’पाटील जे शिव्या खातात तेच मोठे होतात’. “मोहोळ तालुक्यातील अनेक पिपाण्या वाजतात पण त्या पिपाणीत काही दम नाही.बऱ्याचदा पिवळं दिसतं ते सोनं नसतं ते बेन्टेक्स असतं” असं जयकुमार गोरे म्हणाले. मोहोळ येथील भाजप नगराध्यक्ष पदाच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या वेळेस जयकुमार गोरे बोलत होते.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page