चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्दी-खोकल्याचे रूग्ण वाढले असल्याचे दिसून येत आहे. वातावरणातील बदलामुळे हे आजार आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात असून काळजी घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. चिपळूणचा विचार करता सध्या खाजगी दवाखाने हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सकाळी थंडी तर दिवसभर उष्मा होत आहे. त्यातच अधूनमधून मळभ येत आहे. यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना सर्दी, खोकला व ताप येण्याचे प्रमाण कमी असले तरी सर्दी-खोकला अधिक आहे. हा त्रास किमान आठवडाभर जात नसलल्याने सर्वजण हैराण झाले आहेत. असे रूग्ण शासकीय दवाखान्यांमध्ये जात नसले तरी शहरासह ग्र्रामीण भागातील खासगी दवाखाने हाऊसफुल्ल झाले आहेत. काही रूग्णांना १५ दिवसही त्रास होत आहे. वातावरणातील बदलामुळे हा आजार पसरत असला तरी आजारी व्यक्ती तितकीशी काळजी घेताना दिसत नाही. शिंका, खोकला आल्यावर त्यांच्याकडून कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने हा आजार पसरत आहे.