
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या (सोमवार) शेवटच्या दिवशी महायुतीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आणि इच्छुकांना सामावून घेण्यासाठी भाजपने मोठा निर्णय घेतला असून, भाजपचे तीन प्रमुख इच्छुक नगरसेवकपदाची निवडणूक थेट शिवसेनेच्या (शिंदे गट) चिन्हावर लढवणार आहेत. या अनपेक्षित घडामोडीमुळे रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे प्रबळ दावेदार मानले जाणारे खालील तीन इच्छुक उमेदवार आता शिवसेनेकडून निवडणूक लढवणार आहेत. यामध्ये राजीव कीर (प्रभाग क्र. ६), मेधा कुलकर्णी (प्रभाग क्र. ६) आणि सुशांत उर्फ मुन्ना चवंडे (प्रभाग क्र. १५) हे तिन्ही उमेदवार आपापल्या प्रभागात भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आणि प्रभावी दावेदार म्हणून ओळखले जात होते.
महायुतीमधील जागावाटपावरून आणि तिकीट न मिळाल्यास इच्छुकांकडून होणाऱ्या बंडखोरीच्या भीतीने मोठा पेच निर्माण झाला होता. हा तिढा सोडवण्यासाठी रविवारी रात्री उशिरापर्यंत दोन्ही पक्षांच्या (भाजप आणि शिवसेना) वरिष्ठ नेत्यांमध्ये महत्त्वाच्या बैठकांचे सत्र सुरू होते.
अखेर, या तीन महत्त्वाच्या जागांवर भाजपच्या निष्ठावान इच्छुकांना शिवसेनेच्या चिन्हावर लढवण्याची ‘तडजोड’ करण्यात आली. हा ‘शिवसेना पॅटर्न’ महायुतीने बंडखोरी टाळण्यासाठी आणि सर्व प्रमुख इच्छुकांना निवडणुकीत उतरवण्यासाठी ऐनवेळी अमलात आणल्याचे बोलले जात आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर