लांजा : लांजा तालुक्यातील पालू येथे महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून प्रौढाला मारहाण करून आत्महत्येस प्र्रवृत्त केल्याप्रकरणी दोाा आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली. चार वर्षे सश्रम कारावास व ७ हजार रुपये दंड असे शिक्षेचे स्वरूप आहे. संतोष सखाराम कांबळे व मिलिंद देवजी कांबळे (रा. पालू बौद्धवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. लांजा पोलिसांकडून त्यांच्याविरूद्ध दोषारोपपत्र ठेवण्यात आले होते.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारी पक्षाकडून ऍड. प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिले. खटल्यातील माहितीनुसार लांजा तालुक्यातील पालू बौद्धवाडी येथील रहिवासी भिकाजी रत्ना कांबळे (५२) यांचे एका महिलेशी अनैनिक संबध आहेत. असा संशय संतोष व मिलिंद कांबळे यांना होता. यातून ९ जानेवारी २०२१ रोजी आरोपी संतोष व मिलिंद यांनी आपल्याला दमदाटी व मारहाण केली अशी तक्रार भिकाजी कांबळे यांनी लांजा पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
यानंतर आरोपी यांनी भिकाजी कांबळे यांना त्रास देणे चालूच ठेवले. ७ एप्रिल व ८ एप्रिल रोजी आरोपी यांनी भिकाजी कांबळे यांना दमदाटी करत मारहाण केली तसेच गाव सोडून जाण्यास सांगितले. आरोपी यांच्याकडून सातत्याने होणार्या त्रासाला कंटाळून भिकाजी कांबळे यांनी ९ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास राहत्या घराच्या हॉलमधील लाकडी भालाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. असा आरोप आरोपी यांच्याविरूद्ध ठेवण्यात आला होता.