
बीड- मराठ्यांनी यापुढे शासक आणि प्रशासक बनायचे आहे. हा एक शब्द आज दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगत आहे. मराठ्यांनी डोके लावून आणि हुशारीने शासक आणि प्रशासक बनायचे. शासक बनलात तर कोणाला मागायची गरज पडणार नाही. शेतात काम करता करता, घरात काम करता करता, व्यवसाय करता करता, शेतीचे काम करताना, नोकऱ्या करताना, आपल्याला शासक आणि प्रशासक बनायचे, हे लक्षात राहू द्या, असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. नारायण गडावर आयोजित दसरा मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मराठा समाजावरील असलेला दारिद्र्याचे गंज काढायचा असेल तर तुम्हाला शासक बनावेच लागणार आहे. कोणी डोक्यावर हात फिरवला, कोणी हातात हात दिला, कोणी चहा पाजला, म्हणून आपण मोठे होणार नाही. या दसऱ्याच्या निमित्ताने सांगतो की, जातीला सांभाळायचे असेल जातीच्या अडचणी दूर करायच्या असेल, तर शासक बनावेच लागेल. प्रशासनामध्ये प्रचंड ताकद आहे. कितीही मोठा दादा जरी असला, तरी हात जोडून प्रशासकासमोर उभे राहावेच लागते. दादाला देखील हात जोडून प्रशासनासमोर उभे राहावे लागत. राजकीय नेता असला, कितीही मोठा गुंड असला तरी प्रशासनापुढे हात जोडून उभे राहावे लागत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याला हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांनी हजेरी लावली. प्रकृती बरी नसतानाही जरांगे यांनी खुर्चीवर बसून समाजाला संबोधित केलं. या वेळी त्यांनी मराठा समाजाला दोन महत्त्वाचे कानमंत्र दिले. मराठा समाजाने शासक आणि प्रशासक बनले पाहिजे. आपण प्रशासनात असलो तर भल्याभल्यांना आल्यासमोर झुकावे लागेल, असा ठाम संदेश त्यांनी दिला. भाषणादरम्यान मराठा आरक्षणाच्या लढ्याबाबत बोलताना जरांगे यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
मी संपूर्ण आयुष्य झिजवलं…
जरांगे यांनी भाषणाच्या सुरुवातीला आरक्षणाच्या लढ्याबाबत बोलताना मनातील वेदना व्यक्त केल्या. मी कधीच शांत बसलो नाही. माझं संपूर्ण आयुष्य झिजवलं. आता मला काही वाटत नाही, असे ते म्हणाले. सातारा संस्थान पश्चिम महाराष्ट्रासाठी तर हैद्राबाद गॅझेट मराठवाड्यातील मराठ्यांसाठी महत्त्वाचे होते, पण हे लक्षात असूनही आरक्षण रोखले गेले, असा आरोप त्यांनी केला. राज्याला वेढा टाकण्याची ताकद मराठ्यात आहे. हे माहीत होतं म्हणून आरक्षण मिळू दिले जात नव्हते असा आरोप देखील जरांगे पाटील यांनी केला आहे.
फितुरांनी हे समजून घ्यायला हवं होतं..
लढ्यादरम्यान झालेल्या फितुरीवर त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आपलेच लोक विरोधात गेले. जीव धरणीला टेकला तरी मी मागे हटलो नाही. पण फितूरांनी हे समजून घ्यायला हवे होते. मी लढणारा आहे आणि हा लढणारा समाज आहे. जर मी विकून मोठा झालो असतो तर फितुरी योग्य होती. पण आमचे रक्त असूनही तुम्ही भेसळ रक्तासारखे का वागलात? हे मराठ्यांना कळले नाही, अशी खंत देखील मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.
मी थोडा दिवसाचा पाहुणा
मी थोडा दिवसाचा पाहुणा आहे; शरीर आहे, त्याचे काही सांगता येत नाही. आता तब्बेत सोथ देत नाही, असे ते डोळे भरून म्हणाले. माझ्या गरीबाच्या लेकराचं कल्याण करून द्यायचं होतं; त्यामुळेच मुंबईला चला असं सांगितलं होतं. मी आहे तोवर माझ्या समाजाच्या लेकरांना आरक्षण मिळालेलं पाहायचे आहे. मागे कुणी हटू नका. या भावनिक उद्गार मनोज जरांगे पाटील यांनी काढले.
एका वर्षात 58 लाख मराठ्यांना आरक्षणात घातले…
जरांगे यांनी त्यांच्या आयुष्यभराच्या संघर्षाचा आढावा घेतला आणि सांगितले की ते कधीच नाटक केलेले नाही. गरिब मराठा समाज होरपळताना मी बघत होतो; मी कधी खोटं बोललो नाही. लेकीबाळींचे दु:ख पाहत होतो. सहा कोटी मराठे आता सुखी राहावेत, हा आमचा उद्देश होता, असे त्यांनी स्पष्ट केले. जरांगेांनी जाहीरपणे आपल्या कामगिरीचा आकडा देखील मांडला. मी आणि माझ्या गरिब मराठ्यांनी एका वर्षात 58 लाख मराठ्यांना आरक्षणात घातले; दोन वर्षांत तीन कोटी मराठे आरक्षणात घालण्यात आले, असे त्यांनी सांगतीले.
गुलामीचं गॅझेट आहे तर मग… इंग्रज तुमच्या घरात राहत होते का?…
मराठा आरक्षणाच्या लढ्याला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी थेट हल्ला केला. आमचं गुलामीचं गॅझेट आहे, असं म्हणणारी ही भिकार औलादी. गॅझेट गुलामीचं आहे तर मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? तुमच्या डोक्यातील किडे जाळून टाका, अशा शब्दांत जरांगे यांनी आपला संताप व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, निवडणुकीच्या आधी हे लोक आपल्याला डिवचतात. मी उत्तर दिलं की मग तीन-चार महिने गप्प बसतात. घाबरलो असं म्हणू नका. पण गुलामीचं गॅझेट म्हणणारे जे शब्द बोलतात, ते आपल्या काळजाला लागतात. हे जर आमच्याबद्दल बोलत असतील तर त्यांनी आपल्यालाही गुलाम म्हटलं आहे. मग अशांच्या प्रचारासाठी का काम करता? दहा-पाच हजार रुपयांसाठी कशाला गुलाम बनता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
समाजाला गुलाम समजणाऱ्यांना समाजानेच धडा शिकवला पाहिजे…
जरांगे यांनी यावेळी समाजातील तरुणांना थेट इशारा दिला तुमच्या जातीला घाण म्हटलंय, तुमच्या औलादीला गुलाम म्हटलंय. मग त्यांच्यासोबत काम का करता? गेलं राजकीय करिअर खड्ड्यात, पण समाजाच्या आत्मसन्मानाशी तडजोड करू नका. इंग्रजांच्या जनगणनेवरून त्यांनी विरोधकांना चिमटा काढला. आमचं गॅझेट निजामाचं आहे, पण इंग्रजांच्या जनगणनेनं तुम्हाला आरक्षण मिळालं का? 1931 च्या जनगणनेवर तुम्हीच आरक्षण घेतलं. मग आम्ही म्हणायचं का की इंग्रज तुमच्या परिवारातील होते? असा खडा सवाल त्यांनी केला. सभेच्या अखेरीस जरांगे यांनी स्पष्ट संदेश दिला की, मराठा समाजाला गुलाम समजणाऱ्यांना समाजानेच धडा शिकवला पाहिजे. कुणाच्या पायाखाली काम करण्यापेक्षा आत्मसन्मान जपा. मराठ्यांनी आता शासक आणि प्रशासक बनलं पाहिजे. मग कुणाच्याही दयेवर जगावं लागणार नाही.
ओबीसींवर हल्ला नाही, पण बोलणाऱ्या नेत्यांना सोडणार नाही…
मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांना थेट इशारा दिला. यावेळी त्यांनी काही नेत्यांची नावं घेत टोला लगावला. छगन भुजबळ बावचळले आहेत. त्यांना म्हशीवानी बांधायला हवं. समाजात तज्ज्ञांना घेऊन बसतात, पण कुळातच घेतले, बिगरकुळाचे का घेतले नाही, हे विचारायला हवं. मराठे आत नाहीत तर बाहेर जायचं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सभेत जरांगे यांनी खासगी संवादही उघड केला. सात-आठ दिवसांपूर्वी विखे पाटलांचा फोन आला होता. ते म्हणाले, तुम्ही दसऱ्याला आंदोलन करणार आहात का? अधिकाऱ्यांसाठी शिबिर घ्यावं लागेल, त्यांना विसरायला होतंय. त्यावर मी त्यांना एक महिना मुदत दिला, नंतर पाहू, असं जरांगे यांनी सांगताच सभा घोषणाबाजीने दणाणून गेली.
ओला दुष्काळसह शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी; अन्यथा निवडणूकांवर बहिष्कार…
शेतकरी प्रश्नांवर केंद्रीत त्यांनी सरकारवर टीका केली. आज पुन्हा एकदा त्यांनी डेडलाइन जारी केली. जरांगे म्हणाले की, राज्य सरकारने दिवाळीपूर्वी महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची आणि प्रशस्त मदत जाहीर करावी; अन्यथा ते व त्यांच्या मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आंदोलन तसेच निवडणूकांचा बहिष्कार करण्यास उभी राहतील. जरांगे यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने सातत्याने मागितलेल्या मागण्यांपैकी काही मुद्दे खुलेपणाने मांडले आणि त्यावर कटाक्षाने पंधरा दिवस ते एक महिना अशी वेळ मर्यादा ठरवली आहे.
हेक्टरी 1 लाख 30 हजार रुपये मदत..
जरांगे यांनी जेवढे ठोस आर्थिक उपाय सुचवले आहेत ते ऐकण्यास कठोर आहेत. ज्या शेतात पिक वाहून गेले आहेत किंवा पाणी साचल्यामुळे जमिन खरडून गेली आहे, अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख 30 हजार रुपये मदत द्यावी. ज्या शेतांमध्ये नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे त्यांना हेक्टरी 70 हजार रुपये अनुदान करावे. पिकांचे नुकसान झाले असल्यास 100 टक्के नुकसानभरपाई देण्यात यावी आणि पंचनामे अग्रक्रमाने, ताबडतोब पूर्ण करून प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. त्यांनी सरकारकडून दिलेल्या कागदी मदतीऐवजी प्रत्यक्ष रोख आणि अन्नधान्याचे तातडीने वाटप होणे गरजेचे असल्यावर जोर दिला.
राजकारण्यांच्या आणि धनी व्यक्तींच्या संपत्तीवर कर लावून शेतकऱ्यांना मदत करा
जगण्याच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांवर आता बँका व इतर वित्तीय संस्था कश्या प्रकारे कडक होत आहेत, यावरही जरांगे यांनी कटाक्ष केला. शेतीला नोकरीचा दर्जा द्यावा, शेतकऱ्याला पगाराची हमी द्यावी, हमीभावाची व्यवस्था कायम ठेवावी, या प्राथमिक मागण्या आहेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या परागारातील चौथा हिस्सा कापून तो शेतकऱ्यांना द्यावा; राजकारण्यांच्या आणि धनी व्यक्तींच्या अनावश्यक संपत्तीवर कर लावून त्या धनातून शेतकऱ्यांना मदत करावी, असे त्यांनी सांगितले. तसेच उद्योगसमूहांवरील अनुषंगाने अंबानीचं तेल-मीठ बंद करा या शैलीत त्यांनी खरी मदत व निधी शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
दिल्लीवर मोर्चा काढण्यापर्यंत देखील जाऊ
जरांगे यांनी आवाज अधिक तीव्र करतानाच स्वतःच्या आक्रमक धोरणाची रुपरेषाही मांडली. आपण सरकारला 15 दिवस ते एक महिना वेळ देत आहोत. जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही जिल्हा पातळीवर कोणत्याही महायुतीचे एकही स्थानिक प्रतिनिधी निवडून येऊ देणार नाही. तसेच जर गरज भासली तर आम्ही सार्वजनिक सभा, नेत्यांचे कार्यक्रम, शासकीय बैठका, सर्व ठिकाणी बंदी घालू आणि अखेर दिल्लीवर मोर्चा काढण्यापर्यंत देखील जाऊ, असे त्यांनी सांगितले.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*

