जिल्ह्यातील धरणे ओसंडली; कळवा-मुंब्र्याचा माठ कोरडाच,राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपाची आंदोलने….

Spread the love

ठाणे: मुंबईसह ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारी धरणे आणि तलाव पाण्याने पूर्ण भरली असून विसर्गही सुरू आहे. अशा स्थितीत ठाणे शहरातील कळवा आणि मुंब्रा परिसरात अपुऱ्या पाण्याने नागरिकांचे हाल सुरू असून आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने ठामपा मुख्यालयावर तर भाजपने कळवा प्रभाग समितीवर धडक मोर्चा काढून प्रशासनाचे वाभाडे काढले.

…तर आयुक्तांनाच दालनात कोंडू-आव्हाड

कळवा, मुंब्रा भागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेकदा तक्रारी करूनही पाण्याची समस्या सोडविण्यात येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी थेट ठाणे महानगर पालिकेवर धडक दिली. यावेळी त्यांच्यासोबत माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि कळवा, मुंब्रा परिसरातील महिला उपस्थित होत्या. गणेशोत्सवात पाण्याची टंचाई होती. आता नवरात्रोत्सवातही पाणी टंचाई आहे. आता आम्ही तुम्हाला दसऱ्यापर्यंत मुदत देत आहोत. जर, नवरात्रीच्या आत पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर आयुक्तांना त्यांच्या दालनातच कोंडून ठेवू, असा इशारा यावेळी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी या महिलांसह पाणी खात्याचे अभियंता विनोद पवार यांच्या दालनात ठाण मांडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी, कळवा-मुंब्रा परिसरातील पाणी टंचाईमागे राजकारण असल्याचा आरोप केला. ठाणे शहरात सर्वत्र पाणी उपलब्ध असताना कळवा, मुंब्र्यात पाण्याची टंचाई का? मुंब्र्याच्या अल्मास काॅलनीतील संप-पंप केंद्राचा पंप सहा दिवस बंद आहे. अवघे पाच हजार रूपये खर्च असताना तो देखील पालिका करीत नाही. कल्याण फाटा येथे वाॅल्व्ह उघडून पाणी वळविले जात असल्याने मुंब्र्याला पाणी पुरवले जात नाही. मेट्रोसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठाण्यात येतात. निवडणुकीसाठी पूर्णत्वास न आलेल्या मेट्रोची ट्रायल रन घेतली जाते. मात्र, पाण्यासारखी मूलभूत गरज भागविली जात नाही. घोडबंदर रोडला पाणी नाही, कळवा- मुंब्र्यात पाणी नाही मात्र नौपाड्यात प्रचंड पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप श्री.आव्हाड यांनी केला.

भाजपच्या महिलांनी फोडले माठ

कळवा परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून महापालिकेकडून पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने बुधवारी संतापाचा भडका उडाला. भाजप आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कळवावासियांनी प्रभाग समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारला. प्रभाग समिती कार्यालयाबाहेर मडके फोडून यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.

ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या कळवा उपनगराला गेल्या काही महिन्यांपासून टंचाईच्या झळा पोहचत आहे. ऐन पावसाळ्यातही येथील पाणीपुरवठा वारंवार खंडीत होत आहे. त्यात पारसिक नगर येथील ओझन व्हॅली येथून जलवाहिनीतून येणारे पाणी कमी दाबाने येत आहे. अनेक ठिकाणी गळती आणि पाणीचोरी होत आहे. त्यामुळे कळवावासियांवर पाणीबाणीचे संकट ओढावले आहे. या संदर्भात येथील रहिवाशांनी वारंवार कळवा प्रभाग समिती येथील पाणी पुरवठा विभागात तक्रारी केल्या. परंतु कोणतीच कार्यवाही झाली नसल्याची तक्रार
आंदोलक महिलांनी केली.

यावेळी आमदार संजय केळकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संदीप लेले, माजी उपमहापौर अशोक भोईर, मंडळ अध्यक्ष सुदर्शन साळवी, महिला सरचिटणीस नीता पाटील, पदाधिकारी हर्षला बुबेरा, विनोद पाटील, मनोज साळवी, लक्ष्मीकांत यादव आदी उपस्थित होते.

भाजप कार्यकर्त्यांनी व महिलांनी कावेरी सेतू ते प्रभाग समिती असा आक्रोश मोर्चा काढला यावेळी महिलांनी डोक्यावर मडके घेऊन कळवा प्रभाग समितीच्या प्रवेशद्वाराजवळ फोडून आपला निषेध व्यक्त केला. कळव्यात समान पाणी पुरवठा होत नसल्याचे सांगून आठ व्हॉल्व तत्काळ खोलण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पाणी पुरवठा नियमित करावा, तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाजवळ बांधून तयार असलेल्या जलकुंभाला नवी जलवाहिनी जोडून त्याच्यातून कळवा विभागाला पाणी पुरवठा करावा, एमआयडीसी व स्टेममधून खंडित होणार्‍या पाणी पुरवठा संदर्भातील माहिती कळव्यातील नागरिकांना ध्वनीक्षेपकाद्वारे देण्यात यावी, अशी मागणी कळवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त ललिता जाधव व पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता अतुल कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली.

मागील चार महिन्यांपासून एमआयडीसीकडून वारंवार पाणी पुरवठा खंडित होत असल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. सध्या तीन ते चार तास सकाळ-संध्याकाळ पाणी पुरवठा नियमित सुरू राहील तसेच गळती लागलेल्या जलवाहिन्या तातडीने दुरुस्त करून या पुढे पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन यावेळी पाणी पुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता अतुल कुलकर्णी यांनी दिले.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा

आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..

“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page