लांजा : लांजा तालुक्यात थंड हवेचे ठिकाण असलेल्या माचाळ येथे पार पडलेल्या पहिल्या सापड लोककला आणि पर्यटन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गावात स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर तीन वर्षापूर्वी रस्ता पोहोचला. त्यामुळे या गावातील पर्यटन बहरावे, यासाठी राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने येथे सापड लोककला आणि पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले होते. गावातील शतायुषी जोडपे सखाराम आणि लक्ष्मीबाई भातडे यांचे औक्षण व घरापासून घोडागाडीतून सवाद्य मिरवणूक काढून महोत्सवाचा प्रारंभ झाला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अजित यशवंतराव, कोकणभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव, डॉ. श्रीधर ठाकूर, धीरज वाटेकर, युयुत्सू आर्ते, सुनील कुरूप, नितीन कदम यांनी मनोगत व्यक्त केले.
माचाळ येथील नागलीच्या पिकापासून तयार केलेले पदार्थ लांजातील सुहासिनी सार्दळ यांनी सादर केले. गोविंद मांडवकर व सहकार्यांनी डफावरचे गाणे, माचाळच्या महिला मंडळाची फुगडी, रूपेश मांडवकर आणि सहकार्यांचे जाखडी नृत्य, कल्पना कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे गीत व आदिवासी नृत्य आणि माचाळची सापड लोककला यांचे यावेळी सादरीकरण केले.