
देवरुख दि १६ सप्टेंबर- सोमवार दि.१५ सप्टेंबर, २०२५ रोजी मुंबई विद्यापीठ ‘वारसा भाषा व सांस्कृतिक अध्ययन उत्कृष्टता केंद्र’ इमारतीचा भूमिपूजन समारंभ व ‘विद्यापीठ पुरस्कार वितरण समारंभासाठी’ देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार श्री. विलास विजय रहाटे यांनी श्री. किरेन रिजिजू यांची काढलेली पोट्रेट रांगोळी ही समारंभाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
या समारंभाचे प्रमुख अतिथी श्री. किरेन रिजिजू, मंत्री अल्पसंख्यांक कार्य आणि संसदीय कार्य, भारत सरकार हे होते. या समारंभाला प्रमुख उपस्थिती डॉ. चंद्र शेखर कुमार, सचिव अल्पसंख्यांक कार्य व संसदीय कार्य, भारत सरकार यांची होती, तर अध्यक्षस्थानी प्रा.(डॉ) रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ हे होते. तर सन्माननीय उपस्थितांमध्ये प्राचार्य(डॉ.) अजय भामरे. प्र. कुलगुरू, मुंबई विद्यापीठ व डॉ. प्रसाद कारंडे कुलसचिव उपस्थित होते.

श्री किरेन रिजीजू यांनी श्री. विलास रहाटे यांच्याशी हितगुज साधताना रांगोळी कलेबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊन शाबासकी दिली. इतर उपस्थित मान्यवरांनीही विलास रहाटे यांच्या रांगोळी कलेचे कौतुक केले. गेली अनेक वर्ष मुंबई विद्यापीठाच्या विविध विशेष समारंभासाठी अतिथीच्या पोट्रेट रांगोळ्या देवरूखच्या विलास रहाटे यांनी साकारणे हे एक समीकरणच बनले आहे. यापूर्वीही विलास यांनी मुंबई विद्यापीठाच्या विशेष समारंभात महाराष्ट्राचे माजी राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी व श्री. रमेश बैस, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, डॉ. वीरेंद्र कुमार, महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सुप्रसिद्ध गायक पद्मश्री सुरेश वाडकर, अभिनेते अशोक सराफ, शिवाजी साटम, मनोज जोशी इत्यादी दिग्गजांसह डॉक्टर पंकज मित्तल, सेक्रेटरी, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी अशा अनेक मान्यवरांच्या रांगोळ्या चितारून विलास रहाटे यांनी आपल्या कलेचा ठसा सर्वत्र उमटवला आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर