
मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशाच्या मूर्ती विसर्जनासाठी निघाल्याचे दृश्य सर्वत्र दिसत आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गणरायाची उत्तर पूजा करण्यात आली.
मुंबई : 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर मुंबईकर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देत आहेत. मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशाच्या मूर्ती विसर्जनासाठी निघाल्याचे दृश्य सर्वत्र दिसत आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गणरायाची उत्तर पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली आणि गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
बाप्पाला अत्यंत भावनिक वातावरणात निरोप…
अनंत चतुर्दशीदिवशी गणरायाच्या निरोपावेळी मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस, लेक दिविजा आणि कुटुंबासह देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर पूजा केली. यानंतर उत्साहात बाप्पाची आरती करण्यात आली. आरतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. तेथील कृत्रिम तलावामध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. अनेक मान्यवर वर्षा बंगल्यावर आरतीसाठी उपस्थित होते. यावेळी 10 दिवस सोबत राहिलेल्या बाप्पाला अत्यंत भावनिक वातावरणात निरोप देण्यात आला.
राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना…
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 10 दिवस मुंबईसह महाराष्ट्रात बाप्पाच्या आगमनाने एक प्रकारचा खूपच अनुकूल उत्साह संचारलेला आहे, असे सांगत अतिशय उत्साहात आणि आनंदात विसर्जन होत आहे, असे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. राज्यात शांतता नांदो, सर्वांचे विघ्न दूर होवोत, अशी प्रार्थना केल्याचे सांगितले. महाराष्ट्रासाठी बाप्पाकडे सुख, समृद्धी आणि भरभराट दे असा आशीर्वाद दे असे आपण बाप्पाकडे मागणे मागितले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर बाप्पाला शांततेत आणि शिस्त पाळत निरोप द्या, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

अनेक मान्यवरांनी बाप्पाच्या दर्शनासाठी लावली होती हजेरी….
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संपूर्ण कुटुंबासमवेत बाप्पाची विधिवत पूजा केली. मुख्यमंत्र्यांच्या गणपती बाप्पासाठी अत्यंत साध्या आणि पर्यावरणपूरक अशा पद्धतीची आरास करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याप्रमाणेच अनेक राजकीय नेत्यांनी बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर