राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील १० गावे स्मार्ट व इंटेलिजंट करणार : मुख्यमंत्री फडणवीस….

Spread the love

*नागपूर :*  आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पुढे जात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून शेती, आरोग्य, शिक्षण आदी महत्वाच्या सुविधा सातनवरी गावात उपलब्ध करून देत समृद्ध गावाचे रोल मॉडेल उभे राहिले असून लवकरच राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील १० गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. याद्वारे पहिल्या टप्प्यात राज्यातील जवळपास ३ हजार ५०० गावे स्मार्ट व इंटेलिजंट करणार असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
      
केंद्रीय दूरसंचार मंत्रालयांतर्गत कार्यरत व्हाईस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायजेसने (व्हाईस) देशांतर्गत २४ कंपन्यांच्या संघटनांसोबत एकत्र येत राज्य शासन व नागपूर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सातनवरी गावात आधुनिक तंत्रज्ञान आधारित सेवा उपलब्ध करून देत या गावाला देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव बनविले आहे. प्रायोगिक तत्वावर उभारण्यात आलेल्या या स्मार्ट व इंटेलिजंट गावाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंह ठाकूर, सातनवरी गावाच्या सरपंच वैशाली चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यावेळी उपस्थित होते.


        

गावात प्राथमिक शिक्षणात कृत्रिम बुद्धीमत्ता व स्मार्ट शिक्षणाचा उपयोग होवून वैश्विक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल व सातनवरी गाव लवकरच देशात एक रोल मॉडेल म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

असे आहे स्मार्ट व इंटेलिजंट सातनवरी गाव

देशातील भारतनेट प्रकल्पाच्या धरतीवर महाराष्ट्रात महानेट हा प्रकल्प राबविण्यात आला. याअंतर्गत भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांच्या माध्यमातून  स्मार्ट व इंटेलिजंट गावांची योजना आणण्यात आली. यासाठी सातनवरी या गावाची प्रायोगित तत्वावर निवड करण्यात आली. सातनवरी हे गाव नागपूर शहरापासून अमरावती मार्गावर ३२ किलो मीटर अंतरावर आहे.
      

गावांमध्ये आरोग्य, शिक्षणासोबतच स्मार्ट सिंचन, ड्रोनद्वारे किटकनाशके व खत फवारणी, बँक ऑन व्हिल, स्मार्ट टेहळणी अशा एकूण १८ सेवा कमी वेळात उपलब्ध करून देत सातनवरी हे देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव ठरले आहे. या गावातील शेतकरी ड्रोन व सेंसर आदींचा उपयोग करून माती परिक्षण, फवारणी, खते आदींचे योग्य नियोजन करून शेतीचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवू शकतील. गावातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारल्याने गावकऱ्यांचे आरोग्य सुधारेल. टेलिमेडिसिन आदींचा उपयोग होवून गावातच आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध होणार आहे.

🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page