
सिंधुदुर्ग- संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील मटका अड्ड्यावर खुद्द पालकमंत्री नितेश राणे यांनी टाकलेल्या छाप्याचे आता पडसाद खाकी वर्दीत उमटू लागले आहेत. या घटनेनंतर अवघ्या २४ तासात कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक यांनी निलंबित केलं आहे. या निलंबनाच्या कारवाईनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी कणकवलीतील मटका अड्ड्यावर छापा टाकला होता. ही कारवाई करण्यात आल्यानंतर पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली होती. या घटनेचे साईड इफेक्ट पोलीस दलाला भोगावे लागणार हे निश्चित होते. त्यातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी थेट कारवाईचा बडगा उगारला. कणकवली शहरातील एका मटका अड्ड्यावर त्यांनी अचानक छापा टाकत बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर पावले उचलली. या छाप्यानंतर संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली होती.

या संदर्भात शुक्रवारी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट इशारा दिला की, जिल्ह्यातील अवैध धंद्यांना कोणतेही राजकीय किंवा प्रशासकीय पाठबळ मिळणार नाही. जे अधिकारी अशा धंद्यांना संरक्षण देतील त्यांची गय केली जाणार नाही. त्यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना आणि इतर यंत्रणांना एकप्रकारे इशाराच दिला. त्यानंतर सायंकाळी उशिरा पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचं निलंबन करण्यात आलं आहे. या घटनेतील जबाबदार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई होणार हे कालपासूनच निश्चित झालं होतं. पण सर्वात प्रथम कोणावर कारवाई होणार हे मात्र निश्चित नव्हतं. मात्र शुक्रवारी सायंकाळी उशिरा कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक यांनी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना निलंबित करत अवैध व्यवसाय प्रकरणात पहिला दणका दिला आहे. आता यानंतर पुढचा नंबर कोणाचा? अशी चर्चा सुरू झाली आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर