
राजापूर : साडेचार कोटी रुपये खर्च करून तालुक्यातील सोल्ये येथील राजापूर रोड रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरणाचे काम करण्यात आले; मात्र, सुशोभीकरणाच्या कामाला एक वर्ष पूर्ण होण्याअगोदरच छताचा भाग कोसळल्याने या कामाच्या दर्जाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांसह स्थानिक ग्रामस्थांतून या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गतवर्षी राजापूर रोड रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरणाचे काम करण्यात आले. जवळपास पंचवीस वर्षानंतर राजापूर रोड रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण झाल्यानंतर गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात मोठ्या थाटामाटात या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

स्थानकाचे सुशोभीकरण करताना स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या एका बाजूला प्रोफ्लेक्स सीट शेड उभारण्यात आली असून, प्रवेशद्वाराच्या प्रांगणात फुलझाडांनी सुशोभित व स्थानिक वृक्षराजी असलेला बगीचा करण्यात आला आहे. संपूर्ण सुशोभीकरणासाठी जांभ्या दगडाचा वापर करण्यात आला आहे. स्थानक परिसराभोवती असलेल्या भिंतीवर राजापुरातील पर्यटनाची ओळख सांगणारी भित्तिचित्रेही रंगवण्यात आली आहेत. सुशोभीकरणाअंतर्गत स्थानक परिसरात प्रवाशांसाठी बसथांबे, दुचाकी, चारचाकी, बस आणि रिक्षासाठी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सुशोभीकरणाच्या उद्घाटनावेळी हे काम दर्जाहीन असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून करण्यात आला होता; मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले होते. रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या शेडच्या छताचा आतील भाग कोसळला असून, अन्य काही भागही कोसळण्याच्या स्थितीत आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर